जॅकवेलचे नवे डिझाईन संशयास्पद

जॅकवेलचे नवे डिझाईन संशयास्पद

कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत काळम्मावाडी धरणात बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या भिंतीची जाडी (वॉल थिकनेस ४५० वरून १८०० एमएम) वाढवण्यासाठीच्या नव्या डिझाईनमुळे खर्च तिप्पट वाढणार आहे. खर्चाचे हे वाढीव इस्टीमेट व डिझाईन संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. जॅकवेलचे इस्टीमेट १७ कोटींवरून ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. धरणातच पाणी नाही; पण जॅकवेलमध्ये पाणी आहे, असे गृहीत धरून वाढीव खर्चाची टूम काढली आहे. तज्ज्ञांच्या मते आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीप्रमाणे धरणातच पाणी नसेल तर जॅकवेलमध्ये पाणी येणार कोठून, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. योजनेचे ३० टक्‍क्‍यांहून अधिक काम झाल्यानंतर जॅकवेलची किंमत 

वाढविण्याची टूम निघाली असून युनिटीने अभ्यास न करताच डिझाईन आणि इस्टीमेटही केल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

काळम्मावाडी धरणात पाणीसाठा नाही आणि जॅकवेलमध्ये पाणीसाठा आहे. अशा स्थितीत जॅकवेलच्या भिंतीवर पाणी व जमिनीचा मोठा दबाव निर्माण झाल्यास जॅकवेलच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. थेट पाईपलाईन योजनेतील जॅकवेलच्या सध्याच्या डिझाईनमध्ये बदल करून जॅकवेलसाठी भक्‍कम भिंत बांधण्यासाठी वाढीव किमतीचे नवे डिझाईन सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. या नव्या डिझाईनमुळे जॅकवेलच्या सध्या इस्टीमेटपेक्षा किंमत तिपटीहून अधिक वाढणार आहे. त्यामुळे हे डिझाईन बदलण्याची टूम आली कोठून, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत पाणी आणण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या योजनेला केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून निधी मंजूर केला आहे. केंद्राचे ६०, राज्याचे २० आणि महापालिकेचे २० टक्के पैसे या योजनेत घालावे लागणार आहे. या निधीतून सध्या ही योजना सुरू आहे. मध्यंतरी लोखंडी ब्रिजच्या खर्चावरून मोठे वादळ उठले. २५ लाखांच्या कामाचे अडीच कोटी बिल आदा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर वाढीव बिल वसूल करण्यात आले.

काळम्मावाडी धरण
एकूण पाणीसाठा ः २५ टीएमसी
मृत पाणीसाठी (डेड वॉटर) : १.४ टीएमसी
सर्वाधिक खालावलेली पाणीपातळी : .o९ टीएमसी

काळम्मावाडी धरणाच्या इतिहासात एकदाच २८ जून २०१५ मध्ये धरणाची पातळी सर्वाधिक खालावली होती. या काळात ०.९ टीएमसी पाणी पातळी होती. धरणात बांधण्यात येणारे जॅकवेल ४५ मीटर खोल बांधण्यात येणार आहे. या जॅकवेलमध्ये धरणाच्या मृतसाठ्यातील पाणीही खेचण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे धरणात पाणी नाही आणि जॅकवेलमध्ये पाणी आहे, अशी स्थितीच उद्‌भवण्याची शक्‍यता जवळपास नाही. त्यामुळे हे कारण दाखवून जॅकवेलची किंमत वाढविणे हे चुकीचे असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

युनिटी कन्सल्टंटने जॅकवेलसाठी जी जागा निश्‍चित केली आहे, त्या जागेविषयीच यापूर्वी काही अभियंत्याच्या संघटनांनी शंका व्यक्त केली होती. भौगोलिकदृष्ट्या ही जागा योग्य नाही. त्याऐवजी धरणाच्या डाव्या बाजूची साईट जॅकवेलसाठी योग्य होती, असे अहवाल यापूर्वी अनेकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले होते; पण हे अहवाल धाब्यावर बसवून अधिक खर्चिक ठरणारी धरणाची उजवी बाजूच जॅकवेलसाठी का निवडली, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

नव्या डिझाईनमध्ये तीन गोष्टींचा विचार
१) जॅकवेलमध्ये पाणी नाही आणि धरणात पाणी आहे
२) जॅकवेलमध्ये आणि धरणातही पाणी
३) जॅकवेलमध्ये पाणी आहे; पण धरणात पाणी नाही
नव्या डिझाईनमधील तिसरा मुद्दा पाहिल्यास ४५० एमएम थिकनेस असणारी जॅकवेलची भिंत टिकणार नाही. ती अधिक भक्कम करावी लागेल, असा युक्तिवाद आहे. त्यामुळे ही जाडी ४५० वरून १८०० एमएम करण्याचा घाट घातला आहे.

डिझाईन तपासून घेणार : सुरेश कुलकर्णी
कराराप्रमाणे डिझाईन करून द्यायची जबाबदारी ठेकेदार कंपनीची आहे. त्यानुसार त्यांनी हे डिझाईन तयार केले असून हे डिझाईन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इंजिनिअरिंग कॉलेज पुणे यांच्याकडून तपासून घेऊन मगच डिझाईन आणि इस्टीमेंटला मंजुरी देण्यात येईल, असे जलअभियंता सुरेश कुलकणीं यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com