कोल्हापूर महापालिकेचा अनागोंदी कारभार - उपसा १५४, बिल ६० ‘एमएलडी’चे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर - पाणीपट्टीचे दर वाढविले तर लोकप्रतिनिधींचा विरोध, दुसरीकडे पाणीबिलाची मोठी थकबाकी असल्याची ओरड होत असताना प्रत्यक्ष नदीतून उपसा केलेले पाणी व प्रत्यक्षात होणारे बिल यात मोठी तफावत आहे. पाणीचोरी, गळती यामुळे दर महिन्याला  कोट्यवधी रुपयांचे नुकसान महापालिकेला सोसावे लागते. 

कोल्हापूर - पाणीपट्टीचे दर वाढविले तर लोकप्रतिनिधींचा विरोध, दुसरीकडे पाणीबिलाची मोठी थकबाकी असल्याची ओरड होत असताना प्रत्यक्ष नदीतून उपसा केलेले पाणी व प्रत्यक्षात होणारे बिल यात मोठी तफावत आहे. पाणीचोरी, गळती यामुळे दर महिन्याला  कोट्यवधी रुपयांचे नुकसान महापालिकेला सोसावे लागते. 

दररोज शहरासाठी १५४.०८ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा उपसा होतो, प्रत्यक्षात यापैकी ५८.४६ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचे बिल होते. जवळपास ९५.६२ दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेबच महापालिकेकडे नाही. बिल न होणाऱ्या पाण्यांपैकी ६०.०७ दशलक्ष लिटर पाण्याची चोरी होते, किंवा गळतीमुळे हे पाणी वापरले जात नाही. 

घरफाळ्यानंतर पाणीपट्टी हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे, पण या प्रमुख उत्पन्नाकडेच महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवक किती गांभीर्याने बघतात हे दिसून येते. घरफाळा वाढवायचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला की, त्याला नगरसेवकांचा विरोध, पाणीपट्टी वाढीबाबतही नगरसेवकांसह आमदारांचीही भूमिका सारखीच, अशा परिस्थितीत उपसा केलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे राहू दे निदान जास्तीत बिल तरी व्हावे यासाठी तरी महापालिकेने प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. 

शिंगणापूर योजनेचा अपवाद वगळता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे त्याला गळती लागणे अपेक्षित आहे. पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणावर होते, त्याकडे तरी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देणार का नाही? हा प्रश्‍न आहे. एका हॉटेलच्या विहिरीत चार इंची पाईपने महापालिकेचे पाणी सोडले जाते, हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

हवेच्या दाबामुळे दहा टक्के परिणाम
पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर सुरूवातील जी हवा पाईपमधून येते, त्यामुळे मीटर फिरते. यामुळे किमान दहा टक्के परिणाम होतो, त्याचा बिलिंगमध्ये विचार केला जात नाही. 

गळतीमुळे बिल कमी : सुरेश कुलकर्णी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जुन्या असल्याने त्यातून मोठी गळती होते, याशिवाय पाणी चोरीही काही प्रमाणात आहे, त्यामुळे प्रत्यक्ष उपसा व होणारे बील यात मोठी तफावत आहे. दर दिवशी ६५ दशलक्ष लिटर पाण्याचेच बील होते, प्रत्यक्षात १३५ ते १४० दशलक्ष लिटर पाणी उपसा केले जाते. अमृत योजनेतून जुन्या पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या शाळा, रुग्णालये, उद्याने यांना मोफत पाणी असल्याने तेही बिल होत नसल्याचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

९५ एमएलडीचा हिशेबच नाही..
कोल्हापूर शहराला बालिंगा, शिंगणापूर येथून पंचगंगा नदीतून पाणी उपसा केला जातो. शिंगणापूर येथून कसबा बावडा व आपटेनगर पाण्याच्या टाकीसाठी उपसा केला जातो. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या काळात शहरासाठी रोज सरासरी १४३.२८ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा या ठिकाणाहून झाला. याशिवाय, कळंबा तलावातून दहा दशलक्ष लिटर पाणी शहराला सोडले जाते, असे एकूण १५४.०८ दशलक्ष लिटर पाणी शहराला दिले जाते. यापैकी केवळ ५८.४६ दशलक्ष लिटर पाण्याचे बिल होते. उर्वरित ९५.६२ दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेब महापालिकेकडेच नाही. 

दृष्टिक्षेपात कोल्हापूर शहर 

  • लोकसंख्या ः 5 लाख 49 हजार (2011 च्या जनगणनेनुसार) 
  • मिळकती - 1034 
  • पाणी कनेक्‍शन - 1 लाख 17 हजार 28 
  • कूपनलिका - 725 
  • पाणी वापर - एक व्यक्ती दर दिवशी 135 लिटर 
  • रोजचा पाणी उपसा - 135 ते 140 दशलक्ष लिटर 
Web Title: Kolhapur News water Bill issue