एकात्मिक पाणलोट निधीचा गैरवापर

सुनील पाटील
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

शासनाने चांगल्या हेतूने राबविलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचा फज्जा उडविण्याचे काम अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मान्यतेशिवाय आणि प्रशासकीय मंजुरीशिवाय निकृष्ट दर्जाची केलेली कामे करून निधीचा गैरवापर केला आहे. ज्या ठिकाणी निविदा मागवाव्या लागत होत्या, त्या ठिकाणी परस्परच कामे करून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पाणलोटच्या नावाखाली पाण्याऐवजी निधी मुरवण्याचे काम केले आहे.

शासनाने चांगल्या हेतूने राबविलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचा फज्जा उडविण्याचे काम अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मान्यतेशिवाय आणि प्रशासकीय मंजुरीशिवाय निकृष्ट दर्जाची केलेली कामे करून निधीचा गैरवापर केला आहे. ज्या ठिकाणी निविदा मागवाव्या लागत होत्या, त्या ठिकाणी परस्परच कामे करून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पाणलोटच्या नावाखाली पाण्याऐवजी निधी मुरवण्याचे काम केले आहे. अशाच कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने १६ सप्टेंबर २०१५ ला दिलेल्या अहवालानुसार कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही किंवा ती कामेही दुरुस्त केलेली दिसत नाहीत. यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...

कोल्हापूर - जिल्ह्यातील पन्हाळा, आजरा, हातकणंगले, गडहिंग्लज, राधानगरी व करवीर तालुक्‍यातील पंधरा गावांत एकात्मिक पाणलोट योजना राबविली आहे, मात्र ही योजना केवळ नावालाच राबविल्याचे दिसून येते. या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षांनी आपल्या अहवालात अनेक कामांवर ताशेर ओढले असताना कोणताही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. 

घोटवडे (ता. पन्हाळा) येथे फेब्रुवारी २०१५ मध्ये १८.११ हेक्‍टरवर मजगी मारण्याचे काम होते. यासाठी ४४ लाख ६५ हजार रुपयांची कामे केली जाणार होती. यापैकी तपासणी झाली त्या दिवसापर्यंत ९ लाख ७३ हजार रुपयांची कामे पूर्ण झाली होती, मात्र ही कामे करताना या कामाच्या अंदाजपत्रकास पाणलोट समितीची मंजुरीच घेतलेली नव्हती. तसेच ज्या पद्धतीने कामाचे नियोजन होते तसे काम झालेली नाही. याशिवाय ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे, त्याला पाणलोट समितीने आदेश किंवा ठराव न देताच काम पूर्ण केले आहे. ठेकेदाराला या कामाचे पैसे देत असताना वसुंधरा परिपत्रकाप्रमाणे पाणलोट समिती सचिव व कृषी सहायकाने केलेल्या कामाच्या नोंदीबाबत सही आवश्‍यक असताना मजगी क्रमांक २८, २९ व ३० वर पाणलोट समिती अध्यक्षांची सही नाही, तरीही त्या कामाचा निधी आदा केला आहे. ठेकेदाराने पाणलोट विकास निधी म्हणून ४८ हजार रुपये भरणे अपेक्षित होते. काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने ही रक्कम भरण्याचे मान्य केले होते; मात्र तसा कोणताही निधी तपासणी झाली तोपर्यंत भरलेला नव्हता तर, याच कामाची एकूण ३५ हजार ४५० रुपये रक्कम भरणे बाकी होते. या कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावलेले नाहीत. समपातळीनुसार आखणी करून मजगीचे काम पूर्ण झालेले दिसून येत नसल्याचे अहवालात म्हटले होते. एवढा मोठा भोंगळ कारभार असूनही यामध्ये वरिष्ठ पातळीवर किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पाणलोट व्यवस्थापनातील या भोंगळ कारभाराला खतपाणी मिळत आहे.

दृष्टिक्षेपात काम -
पाणलोट समिती घोटवडे (ता. पन्हाळा)
कामाचे लक्ष्य : ५ मानब, २ सिनाब व ३४.३० हेक्‍टर मजगी मारणे   
तपासणी झालेल्या दिवसांपर्यंत पूर्ण काम : १८.११ हेक्‍टर मजगी
एकूण मंजूर निधी- ४४ लाख ६५ हजार
प्रत्येक कामाचा निधी -९.७३ लाख

Web Title: kolhapur news water fund missuse