गांधीनगर, उचगावसह १३ गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती

डॅनियल काळे
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - गांधीनगर, उचगावसह १३ गावांतील नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्याने पाणीपुरवठा बंद आहे. पर्यायी कोणतीही व्यवस्था नसल्याने टॅंकरचे विकतचे आणि कूपनलिकांचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

कोल्हापूर - गांधीनगर, उचगावसह १३ गावांतील नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्याने पाणीपुरवठा बंद आहे. पर्यायी कोणतीही व्यवस्था नसल्याने टॅंकरचे विकतचे आणि कूपनलिकांचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

हजार लिटरची पाण्याची टाकी १०० ते १५० रुपये, पाच हजार लिटरचा टॅंकर ४०० ते ५०० रुपयांना विकत घेतला जातो. तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खर्च आणि धावपळही करावी लागत आहे. घरातील पाणी पुरवून वापरण्यासाठी महिलांना धुणे धुण्यासाठी नळावरच्या गळतीला जावे लागते.

उचगाव, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली तामगाव, वळीवडे, कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी या गावांत नागरीकरण वाढले आहे. २०३० पर्यंत या गावांची लोकसंख्या १ लाख ४० हजार होईल. या हिशेबाने १९९७ मध्ये २० कोटी खर्चाची ही योजना तयार केली, पण प्रत्यक्षात २०१८ मध्येच या १३ गावांतील लोकसंख्या १ लाख ७० हजारांवर गेल्याने पाण्याची टंचाई येथे कायमच भासते. येथे दिवसाआड पुरवठा होतो. टंचाईत नागरिकांची वणवण सुरू आहे. जेथे कूपनलिकांना जादाचे पाणी आहे. तेथे एक रुपयांना तीन घागरी पाणी दिले जाते. उचगाव, मणेरमळा येथे असे पाणी विकत घेतले जाते. ७५० लिटर, १००० लिटरचे छोटे पाण्याचे टॅंकर साधारण १०० ते १५० रुपयांना मिळतात. ५ हजार लिटरचा पाण्याचा टॅंकर ४०० ते ५०० रुपयात मिळतो.
 पैसे देउनही तासन्‌तास टॅंकरची वाट पाहात बसावे लागते. 

दृष्टिक्षेपात...
*१९९७ ची योजना
*लोकसंख्या १ लाख ७० हजारांवर
लोकसंख्या वाढल्याने दिवसाआड पाणी
योजनेचा खर्च दरवर्षी  ५ कोटी
पाणी बिलापोटी वसुली ३ कोटी
* दरवर्षी २ कोटी  तोटा
पाण्याचा दर प्रति हजार लिटर १५ रुपये

कागल येथील दूधगंगा नदी उगम स्त्रोताजवळ तीनशे एचपीचे दोन पंप, कणेरीवाडी जलशुद्धीकरण केंद्राजवळचे विद्युत पंप आणि पाचगावसाठी स्वतत्र पंप असे पाच ते सहा पंप असल्याने वीज बिलाचा मोठा खर्च आहे. कागल ते शेवटचे गाव गांधीनगरपर्यंत २८ किलोमीटरचे अंतर पाईपलाईनला पार करावे लागते. विजेवर सुमारे ५ कोटी इतका खर्च येतो. वसुली ३ कोटी आणि खर्च ५ कोटी अशी स्थिती आहे. 
- बी. जी. पाटील, शाखा अभियंता

Web Title: Kolhapur News Water leakage issue