गवा आला... व्यथा सांगून गेला...

सुधाकर काशीद
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

कोल्हापूर - उन्हाच्या झळांमुळे वन्यप्राणी पशुपक्ष्यांची पाण्यासाठी तगमग ठरलेलीच आहे. पाणवठ्याचा माग काढत त्यांची जगण्याची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत राधानगरी अभयारण्यातील गव्यांच्या एका कळपाने चक्‍क वन विभाग कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या छोट्या हौदाचा तहान भागविण्यासाठी आधार घेतला.

कोल्हापूर - उन्हाच्या झळांमुळे वन्यप्राणी पशुपक्ष्यांची पाण्यासाठी तगमग ठरलेलीच आहे. पाणवठ्याचा माग काढत त्यांची जगण्याची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत राधानगरी अभयारण्यातील गव्यांच्या एका कळपाने चक्‍क वन विभाग कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या छोट्या हौदाचा तहान भागविण्यासाठी आधार घेतला. यातला योगायोगाचा भाग सोडा, पण पाण्यासाठी आपल्याला किती वणवण करावी लागते. हेच या गव्यांच्या कळपाने वनविभागाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा कळप पाण्यासाठी या वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात आला. तर आज दुपारी चक्‍क साडेतीन वाजता एक ऐटदार गवा पाणी पिऊन गेला.

राधानगरी गावातून धरणाच्या दिशेने जाताना हत्तीमहाल म्हणून परिसर आहे. या हत्तीमहालासमोर राधानगरी वन्य जीव विभागाचे कार्यालय आहे. त्यातच सामाजिक वनीकरण विभागाचेही कार्यालय आहे. कार्यालयाचे आवार मोठे आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कार्यालयात रेंज फॉरेस्ट ऑफिसर मारुती कुंभार, साताप्पा कांबळे, रामचंद्र सावंत व सुशांत राऊत हे कर्मचारी होते. त्यांना कार्यालयाबाहेरच्या झुडपात आवाज आला. त्यांनी तिकडे पाहले असता पहिल्यांदा चक्‍क एक गवा दिसला. पाठोपाठ त्याची पिले, मादी आली. 
हे पाहून सर्वजण कार्यालयाच्या दरवाजा, खिडकीजवळ आवाज न करता उभे राहिले. 

गव्याच्या कळपानेही परिस्थितीचा अंदाज घेतला व हा कळप काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या छोट्या हौदाजवळ गेला व पाणी पिऊ लागला. तहानलेला हा कळप पाण्यासाठी आलेला पाहून या कर्मचाऱ्यांनी गव्याच्या कळपाला जराही डिस्टर्ब केले नाही. एका कर्मचाऱ्याने मात्र अतिशय सावधपणे या प्रसंगाची छायाचित्रे टिपली. साधारण २० मिनिटे हा कळप तेथे होता व पाणी प्यायल्यानंतर आल्या मार्गाने निघून गेला. 

म्हणूनच वन्यप्राणी मानवी वस्तीत...
जंगलात वन्यप्राण्यासाठी पाणवठे, पाणथळ जागा स्वच्छ करून ठेवल्या असल्या, तरीही उन्हाचा तडाखा इतका आहे, की तेथे पुरेसा पाण्याचा साठा व त्या पाण्यात सातत्य यात अडचणी येतात. चाऱ्याबरोबरच भरपूर पाणी व थंडावा ही वन्यप्राण्यांची गरज आहे. मग त्यासाठी त्यांना मानवी वस्तीत यावे लागते, हे स्पष्टच आहे. योगायोगाने हा गव्याचा कळप चक्‍क वनविभाग कार्यालयातील पाण्याच्या हौदावरच आला. जणू तो त्याची पाण्यासाठी असलेली व्यथाच थेट वनविभागासमोर मांडून गेला.

Web Title: Kolhapur News water scarcity affects on Gava