कोल्हापूर शहरालगतच्या 13 गावात पाणी टंचाईची शक्यता

डॅनियल काळे
शुक्रवार, 4 मे 2018

कोल्हापूर - गांधीनगर, उचगाव, मुडशिंगीसह १३ गावांच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढणे आणि नवीन पाइपलाइन जोडण्याचे काम उद्या शुक्रवार (ता. ४) पासून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात १३ गावांतील सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला आठवडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

कोल्हापूर - गांधीनगर, उचगाव, मुडशिंगीसह १३ गावांच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढणे आणि नवीन पाइपलाइन जोडण्याचे काम उद्या शुक्रवार (ता. ४) पासून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात १३ गावांतील सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला आठवडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. येथे कोणतीच पर्यायी व्यवस्था नाही. महागडे पाणी विकत घेण्याशिवाय लोकांसमोर दुसरा पर्याय नाही.

वीस वर्षांपूर्वीची योजना
तत्कालीन सेना-भाजप युतीच्या काळात १९९७ मध्ये ही योजना करण्यात आली. वीस वर्षे झाली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गळती आहे. तसेच विविध गावांतील पाण्याच्या पाइपलाइनलाही गळती आहे. काही ठिकाणी दूषित पाणी या पाइपमध्ये मिसळत असल्याने दूषित पाण्याचाही पुरवठा होतो.

गावांची नावे
गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, वळिवडे, उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, कणेरी, कणेरीवाडी, सरनोबतवाडी, गोकुळशिरगाव, मोरेवाडी, पाचगाव

अंतर्गत जलवाहिन्याही बदलण्याची गरज
या योजनेतून या तेरा गावांना पाणीपुरवठा होतो; पण तेराही गावांतील अंतर्गत पाइपलाइन या तीनइंची इतक्‍या आहेत. त्यामुळे पूर्ण दाबाने पाणीपुुरवठा होत नाही. तसेच अत्यंत कमी वेळ पाणी येते. एक दिवस आड केवळ पाऊण तास इतका वेळच पाणी येत असल्याने नेहमीच पाण्यासाठी लोकांचे हाल होतात.

फायद्यातील योजना असूनही नागरिकांचे हाल
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आजवर केलेल्या इतर अनेक योजनांपेक्षा ही एकमेव योजना फायद्यात आहे. लोक पाण्यासाठी पैसे मोजतातही; पण पाणी मात्र वेळेवर आणि मुबलक मिळत नाही. त्यामुळे योजनेविषयी लोकांची तक्रार आहे.

कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण केव्हा लक्ष घालणार?
या तेरा गावांचाही समावेश शासनाने प्राधिकरणात केला आहे. विकासाचे गाजर दाखविले आहे; पण पायाभूत सुविधांपैकी पाण्याचीच समस्या या गावामधून आहे. या पाण्याची समस्या सोडविणे हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या आवाक्‍याबाहेरचे आहे. राज्य शासनाने आता या गावांचा समावेश प्राधिकरणात केला आहे. तेव्हा प्राधिकरण याबाबतीत केव्हा लक्ष घालणार. असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मुबलक पाणीपुरवठा झाला, तर या सर्व गावांचा चेहरामोहरा आणखीन बदलणार आहे. विकास होणार आहे.

महागडे पाणी विकत घेण्याची वेळ
आठवडाभर पाणी मिळणार नसल्याने नागरिकांना महागडे पाणी विकत घ्यावे लागणार आहे. पाण्याचे टॅंकर अथवा कूपनलिकातून विकतच्या पाण्यासाठीही तासोनतास प्रतिक्षा करावी लागणार

सतत गळतीमुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होतो. लोकप्रतिनिधींना लोकांच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. जीवन प्राधिकरणाला मात्र याचे गांभीर्य नाही. उचगावमधील एक व्यापक शिष्टमंडळ याबाबतीत उद्या जीवन प्राधिकरणाला जाब विचारणार आहे. लोकांना पाणी का देत नाही, याबाबत विचारणा करू. 
- मालूताई काळे, सरपंच, उचगाव.

उजळाईवाडी गावची लोकसंख्याही दहा हजारांवर आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने लोकांचे हाल होतात.  अचानक गळती काढायची कामे हाती घेतल्याने ग्रामपंचायतीने करायचे काय? प्राधिकरणाने यापूर्वीच कल्पना द्यायला हवी होती. प्राधिकरणाने पाण्याची व्यवस्था करावी.
- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी 

गळती काढावीच लागणार आहे. ग्रामपंचायतीना पत्रे पाठवून पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. पाच दिवस हे काम चालणार आहे.
-बी. जी. पाटील, अभियंता, जीवन प्राधिकरण

 

Web Title: Kolhapur News water scarcity issue