पाणीप्रश्‍नी कोल्हापूर पालिकेत महिलांचा रुद्रावतार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

कोल्हापूर- पाणी प्रश्‍नावरून आजच्या महापालिका सभेत महिला सदस्यांनी पोटतिडकीने व अत्यंत आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. प्रश्‍नांच्या भडीमारामुळे प्रशासनाची बोलती काही काळ बंद झाली. पाणी प्रश्‍न किती गंभीर आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. 

कोल्हापूर- पाणी प्रश्‍नावरून आजच्या महापालिका सभेत महिला सदस्यांनी पोटतिडकीने व अत्यंत आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. प्रश्‍नांच्या भडीमारामुळे प्रशासनाची बोलती काही काळ बंद झाली. पाणी प्रश्‍न किती गंभीर आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. 

 वहिदा सौदागर 
प्रभागातील लोकांनी गटारीचे पाणी प्यायचे का? अळीमिश्रित पाण्यामुळे डेंग्यू रुग्णांत वाढ झाली आहे. लोक सात सात वर्षे घाणेरडे पाणी पितात. प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नाही. आमचा संयम आता सुटला आहे. लोक तुमच्या नव्हे, आमच्या दारात येतात. 

 विजय सूर्यवंशी 
पाण्याच्या वेळा सदस्यांना विश्‍वासात न घेता का बदलल्या? सभागृहात बसायचे की नाही याचा विचार करावा लागेल. अधिकाऱ्यांनी सक्षम असेल तर इथे थांबावे, अन्यथा सभागृहाच्या बाहेर जावे.

 दिलीप पोवार 
अडीच वर्षात एकही प्रश्‍न सुटलेला नाही. आज करतो, उद्या करतो, निविदा काढली आहे. प्रक्रिया सुरू आहे, अशी आश्‍वासने दिली. दरम्यान, पोवार यांनी बाटलीतील पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.  

पूजा नाईकनवरे
आरडाओरड करा, दंगा करा. प्रशासनावर परिणाम होत नाही. आमचा अंत बघू नका. तसे झाल्यास आमचाही हिसका काय आहे कळेल. नाईकनवरे यांचा संताप पाहून सभागृह काही काळ स्तब्ध झाले.

 उमा इंगळे 
‘सकाळ’ने अस्वच्छ पाण्याच्या टाकीकडे लक्ष वेधून गांभीर्य दाखवून दिले आहे. पाण्यासारख्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाने कधीतरी गांभीर्याने पाहावे.

 स्मिता माने 
ई वॉर्डमधील लोकांचा पाणी पाणी करून घशाला कोरड पडली आहे. आश्‍वासने न देता कधी तरी कृती करा.
कविता माने
पुरेशा दाबाने पाणी येत नाही. लोक आमच्या नावाने ओरडतात. पाण्याच्या प्रश्‍नावरून चर्चा करून थकलो आहोत.

 रूपाराणी निकम
आम्हाला काम नाही म्हणून इथे येतो की टाईमपास म्हणून. पाण्याचा विषय अजिबात गांभीर्याने घेतला जात नाही. पूर्वीच्या सभेत चर्चा झाली असतान कर्मचारी आज आपल्या दारात येऊन फिरती कुठे करायची सांगा असे म्हणतो हे योग्य नाही.

 भूपाल शेटे
पाण्याची आणीबाणी दूर करा, ‘अमृत’चे काम शासनदरबारी का लोंबकळत पडले आहे, याचा विचार करा. भाजप-शिवसेनेचे सरकार असताना या कामातून मलई हवी आहे का, अशी विचारणा शेटे यांनी करताच भाजप-ताराराणीचे सदस्य संतप्त झाले. सभागृहात काही गोंधळ झाला. हसीना फरास यांनी प्रशासनाला आपल्यात भांडणे लागावीत, असेच वाटते. त्यामुळे सदस्यांनी वाद घालू नये. अशी विनंती केली.

 उमा बनछोडे
पाण्याचे कसलेही नियोजन होत नाही. लोक आता वैतागले आहेत. भटक्‍या जनावरांबाबत प्रश्‍न मांडला. जनावरे एक दिवस महापालिकेच्या दारात आणून बांधल्याशिवाय राहणार नाही.

 मेहनजबी सुभेदार
पाणीच नव्हे तर कुठल्याच प्रश्‍नावरून गांभीर्य राहिलेली नाही. इथे यायचे मोठ्याने बोलायचे, पुढे काहीही कार्यवाही होत नाही.

 शोभा कवाळे
आमच्या भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. लोकांचा संयम सुटण्याअगोदर हा प्रश्‍न सोडवा.

प्रा. जयंत पाटील
पाण्याच्या प्रश्‍नावरून ही चौथी सभा आहे. अन्य विषयावर चर्चा होऊ नये, अशीच प्रशासनाची भावना आहे का हेच काही समजत नाही.. पाणी प्रश्‍नावरून सभागृहाचीच सहनशीलता संपली आहे. तेच तेच रडगाणे सुरू आहे. व्यवस्थापनातील त्रुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

अशोक जाधव
बावड्याच्या पाण्याच्या टाकीचे काय झाले. किती वर्षे आम्ही वाट बघायची. काम न करणाऱ्या ठेकेदारावर कोणती कारवाई केली.विलास वास्कर, सुरेखा शहा, राहुल चव्हाण कमलाकर भोपळे यांनी संतप्तपणे भावना व्यक्‍य केल्या

 

Web Title: Kolhapur News water scarcity issue