वातावरणाच्या बदलामुळे पीकव्यवस्थापनास फटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने त्याचा फटका लाखो हेक्‍टरवरील पिकांना बसत आहे. वातावरणबदलाचे चटके कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यालाही बसू लागले आहेत. नेहमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात पावसाची दांडी आणि कधीही पाऊस न पडणाऱ्या क्षेत्रात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे अवघड होऊन बसले आहे. पावसाच्या दृष्टीने सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरलाही गेल्या दोन वर्षांत कमी पावसाचा फटका बसू लागला आहे. पावसाच्या बदलत्या परिस्थितीमुळे भविष्यात पिकांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असल्याचे हवामानतज्ज्ञ डॉ.

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने त्याचा फटका लाखो हेक्‍टरवरील पिकांना बसत आहे. वातावरणबदलाचे चटके कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यालाही बसू लागले आहेत. नेहमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात पावसाची दांडी आणि कधीही पाऊस न पडणाऱ्या क्षेत्रात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे अवघड होऊन बसले आहे. पावसाच्या दृष्टीने सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरलाही गेल्या दोन वर्षांत कमी पावसाचा फटका बसू लागला आहे. पावसाच्या बदलत्या परिस्थितीमुळे भविष्यात पिकांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असल्याचे हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

यंदा सरासरी गाठणे अवघड 
पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात होतो; पण गेल्या दोन वर्षांत हा जिल्हाही पावसासाठी आस लावून बसल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाची आकडेवारी पहिल्यास या हंगामात पावसाच्या पहिल्या तीन महिन्यांत सरासरीपर्यंतही पाऊस झाला नाही. जूनमध्ये 70 टक्के, जुलैमध्ये 71 टक्के, तर ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के पाऊस झाला आहे. साहजिकच याचा परिणाम खरीप पिकांच्या व्यवस्थापनावर झाला आहे. पावसाचे मुख्य समजले जाणारे पहिले तीन महिने दोनतीन दिवसांचा अपवाद वगळता कोरडे गेल्याने आता जिल्ह्यातील खरिपावर संकट घोंघावू लागले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला, तरी त्याचा कोणताही उपयोग खरिपाला होणार नसल्याची स्थिती आहे. 

कृष्णा खोरे कोरडेच  
कोल्हापूर जिल्ह्यातील काही धरणे वगळता कृष्णा खोऱ्यात यंदाही अपेक्षित पाऊस झाला नाही. सातारा, सांगली जिल्ह्यांतील अनेक प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा नाही. गेल्या काही वर्षांपासून उत्तरेकडे पाऊस सरकू लागल्याने पुणे, नाशिक भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्या भागात तीनचार दिवस अचानक पाऊस होत असल्याने तेथील पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. याउलट पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण घटल्याने उसासारख्या हुकमी पिकाला त्याचा जोरदार फटका बसत आहे. पाणी असूनही पावसाळी वातावरणातून उसाला पावसातून मिळणारे घटक मिळत नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. 

कोल्हापूर, सांगलीत 35 लाख टन गाळप घटण्याची शक्‍यता 
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा एकूण पावणेदोन कोटी टन गाळपाचा अंदाज आहे. यात सुमारे वीस टक्‍यांनी म्हणजेच 35 लाख टनाची घट येण्याची शक्‍यता कृषी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 1 हजार 50 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर विभाग गाळप ऊसउपलब्धता (कोल्हापूर, सांगली) हेक्‍टरमध्ये 
जिल्हा आडसाली पूर्व हंगामी सुुरू खोडवा एकूण (क्षेत्र) 
कोल्हापूर 23235 34523 23750 62397 143905 
सांगली 26543 16385 7868 29380 80176 
विभाग 49778 50908 30618 91777 224081 

क्षेत्रानुसार एकूण अपेक्षित उत्पादन- 1 कोटी 75 लाख टन 
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार वीस टक्के प्रमाणे घटणारे उत्पादन- 35 लाख टन 
या उसाची सरासरी तीन हजार रुपये प्रति टन याप्रमाणे होणारी रक्कम- 1050 कोटी रुपये 

पावसाची दिशा बदलल्याचे चित्र 
राहुरी कृषी विद्यापीठाचे हवामान विभागप्रमुख डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, ""गेल्या काही वर्षांचा पावसाचा अभ्यास केल्यास हुकमी पावसाचे जिल्हेही पावसासाठी झगडताना दिसतात. ज्या ज्या तालुक्‍यांमध्ये अनेक दिवस पाऊस उघडायचा नाही, त्या तालुक्‍यातही दोन ते तीन दिवसच पाऊस पडून तो गायब होतो. पाऊस पडण्याची हक्काची ठिकाणे बदलण्याचेच हे उदाहरण आहे. राज्यात सर्वत्र पाऊस झाला; पण कोल्हापुरात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्‍यातही पाऊस झाला नाही, हे चित्रच पावसाची दिशा बदलल्याचे स्पष्ट करीत आहे. कृष्णा खोऱ्यातही हीच स्थिती आहे. पूर्वी उत्तर कोकणात पाऊस कमी व्हायचा. पूर्वेकडे जास्त असायचा. आता परिस्थिती उलटी झाली आहे. यामुळे येथून पुढच्या काळात सरसकट तालुक्‍यातील पाऊस मोजून पीक पद्धती ठरविण्यापेक्षा मंडल (सर्कल) नुसार पावसाची आकडेवारी लक्षात घेऊन तेथे पिकांची लागवड करावी लागेल. कारण एकसलग पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. अलीकडच्या काळात अवधीचा तरी खंड पडतच आहे. पाऊस असणाऱ्या मुख्य महिन्यांतच सरासरीइतकासुद्धा पाऊस झाला नाही. त्याचबरोबर सलग प्रदेशामध्येही पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे पीक लागवड करताना याचा विचार करायलाच हवा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news weather crop