पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या लोगोचे अनावरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे आयोजित लोगो (बोधचिन्ह) स्पर्धेत पाचगाव येथील गौरीश सोनारने 34.6 गुणांनी प्रथम तर अजित पाटील (येळवडे, ता. राधानगरी) यांनी 33 गुणांनी द्वितीय, श्रीमती रश्‍मी कोरे (रा. कोथरुड, पुणे) यांनी 31.7 गुणांनी तृतीय क्रमांक मिळविला.

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे आयोजित लोगो (बोधचिन्ह) स्पर्धेत पाचगाव येथील गौरीश सोनारने 34.6 गुणांनी प्रथम तर अजित पाटील (येळवडे, ता. राधानगरी) यांनी 33 गुणांनी द्वितीय, श्रीमती रश्‍मी कोरे (रा. कोथरुड, पुणे) यांनी 31.7 गुणांनी तृतीय क्रमांक मिळविला.

देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी तयार केलेला हा लोगो आहे. लोगोचे अनावरण आज देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य संगीता खाडे, शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते झाले. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात कार्यक्रम झाला. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी प्रमुख उपस्थित होते. 

प्रथम विजेत्या गौरीशला श्री अंबाबाईची मूर्ती, प्रमाणपत्र, 21 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ देऊन गौरविले. अन्य विजेत्यांना तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान केले. देवस्थान व्यवस्थापन समितीने कार्यालयाचा लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. याकरिता कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यांतून 91 लोगो प्राप्त झाले.

अंतिम लोगो निवडण्याकरिता कलानिकेतनचे प्राचार्य सुरेश पोतदार, दळवीज आर्टस्‌ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, शाहीर राजू राऊत, आर्किटेक्‍ट राजेंद्र सावंत, देवस्थानचे सचिव विजय पोवार यांनी परीक्षणाचे काम पाहिले. लोगो परीक्षण करताना तांत्रिकता, कल्पकता, रचना, परिणाम आदी घटकांचा विचार करून 91 लोगोंपैकी 15 लोगोंची प्रथम निवड केली. यानंतर 15 लोगोतून निकषांद्वारे 10 लोगोंची निवड केली. निवडीच्या तृतीय फेरीत निर्णायक पाच लोगो निवडले. अंतिम फेरीत पाचपैकी तीन लोगोंचे निर्णायक गुणांकन केले. याकरिता परीक्षकांसमोर लोगोच्या प्राप्त फाईल नंबरप्रमाणे लोगो आणि संकल्पना होती. 

देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव म्हणाले, ""ही स्पर्धा फक्त अंबाबाई मंदिरासाठी नव्हती; तर समितीच्या अंतर्गत येणाऱ्या तीन हजार 42 मंदिरांसाठी होती. या मंदिरांना सामावून घेणारा एखादा लोगो असला पाहिजे, ही भूमिका समितीची होती. याकरिता आम्ही 21 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून लोगोसाठी स्पर्धा घेतली. हा लोगो देवस्थानच्या लेटरपॅडवर, पावती बुकांवर, व्हिजिटिंग कार्डवर, प्रसादाच्या पाऊचवर, कॅरीबॅग, डिस्प्लेवर दिसेल. समितीची याद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होईल.''

शिवाजीराव जाधव म्हणाले, ""मंदिरात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भाविक, पर्यटकांकरिता चांगल्या गोष्टी समितीतर्फे करायच्या आहेत. समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व देवस्थानांना भेटही देण्यात येत आहे.''

श्री. राऊत म्हणाले, ""श्री अंबाबाई मंदिराचे ब्रॅंडिंग व्हावे, हा उद्देश लोगो तयार करण्याचा होता. लोगो अंबाबाई मंदिराची सर्वत्र ओळख तर करून देईल'' 

सचिव विजय पोवार यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. सहायक सचिव साळवी, अन्य सदस्य उपस्थित होते. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Kolhapur News West Maharashtra Devasthan Committee Logo inauguration