मोडी लिपीची परंपरा जपण्यासाठी व्हॉटस्‌ ॲप ग्रुप

निखिल पंडितराव
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

राज्यभरातून अनेकांचा सहभाग - रोज भरतो ऑनलाईन वर्ग

कोल्हापूर - सायंकाळी सात वाजले की व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर एक संदेश येतो. पहिल्यांदा रेषा मारा आणि रेषेला धरूनच अक्षर काढा... आजचे अक्षर अ.. आ.. त्यानंतर प्रत्येक जण सरांनी दिलेले अक्षर घरात बसून एका कागदावर काढतात... त्याचा सराव करतात आणि परत त्याचे छायाचित्र काढून पुन्हा व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर टाकतात... प्रत्येकाने काढलेल्या अक्षरांची तपासणी सरांकडून होते... चुकले तिथे ते दुरुस्त करण्याची सूचना आणि चांगले त्यांना शाबासकी... मोडी लिपीचा हा ऑनलाईन वर्ग.

मोडीची परंपरा खंडित होऊ नये, मोडी लिपी प्रत्येकाने शिकावी, यासाठी ‘मोडी प्रशिक्षण वर्ग’ नावाचा व्हॉटस्‌ ॲप ग्रुप सुरू झाला आहे. प्रत्येकी २०० ते २५० जणांचे तीन ग्रुप सध्या कार्यरत आहेत. ऐतिहासिक मोडीची परंपरा जपण्यासाठी डिजिटलची कास धरण्यात आली आहे. पारनेर (जि. नगर) येथील मोडी लिपीचे अभ्यासक अशोक नागरे म्हणाले, ‘‘या ग्रुपच्या माध्यमातून मोडी लिपी अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यासता येत आहे. मोडी लिपी इतिहास जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेच; पण जर एखाद्याने पूर्णवेळ व्यवसाय म्हणून याचा स्वीकार केल्यास त्याला एखाद्या सरकारी नोकरीपेक्षा अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते. सध्या डिजिटल युगातही या लिपीचे महत्त्व टिकून आहे. शाळेच्या दाखल्यांपासून विविध कामांसाठी याची गरज अनेकांना लागते. त्यामुळे मोडी लिपी शिकणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ग्रुपच्या माध्यमातून या मोडीचे शिक्षण
देण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे.’’

परंपरेला डिजिटलची जोड
या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपचे पट्टणकोडोली येथील ॲडमिन अंबरीश कुडाळकर म्हणाले, ‘‘माझ्या घरी मोडीची कागदपत्रे सापडली. त्या वेळी त्याचे वाचन करण्यासाठी मला बरेच कष्ट घ्यावे लागले. यातूनच मग मी स्वतः मोडी लिपी शिकून थोडेफार वाचन करू लागलो. त्यानंतर मोडी लिपीची माहिती आणि परंपरेची माहिती सर्वांना झाली पाहिजे, म्हणून परंपरेला डिजिटलची जोड दिली. यातूनच मोडी प्रशिक्षण वर्ग हा ग्रुप तयार केला. त्यावर मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या प्रयत्नाचे यश निश्‍चितच दिसेल.’’

Web Title: kolhapur news whatsapp group for modi language