‘व्हॉटस्‌ ॲप’ ग्रुपवरून दारू, जुगार बंद

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 27 जुलै 2017

कोल्हापूर - या ग्रुपमधील एका महिलेनं जुगार अड्ड्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जुगार अड्डा उद्‌ध्वस्त केला. गावात दारूबंदी असतानाही दारू विकली जात होती. महिलेने तक्रार केली, दुसऱ्या दिवशी अड्डा उद्‌ध्वस्त करून त्याचे फोटो ग्रुपवर शेअर केले. कारवाई न करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची तातडीने बदली केली. एवढंच नव्हे, तर प्रत्येकाच्या तक्रारीची दखल घेण्यात आली. ही कमाल आहे, ‘आयजी १०० व्हॉटस्‌ ॲप ग्रुप’ची.

कोल्हापूर - या ग्रुपमधील एका महिलेनं जुगार अड्ड्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जुगार अड्डा उद्‌ध्वस्त केला. गावात दारूबंदी असतानाही दारू विकली जात होती. महिलेने तक्रार केली, दुसऱ्या दिवशी अड्डा उद्‌ध्वस्त करून त्याचे फोटो ग्रुपवर शेअर केले. कारवाई न करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची तातडीने बदली केली. एवढंच नव्हे, तर प्रत्येकाच्या तक्रारीची दखल घेण्यात आली. ही कमाल आहे, ‘आयजी १०० व्हॉटस्‌ ॲप ग्रुप’ची.

जिल्ह्यातील गल्लीबोळात काय चालले आहे, याची माहिती थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांपर्यंत पोचवण्याचे काम या ग्रुपद्वारे होते. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील काही सामान्य व्यक्ती आणि काही पत्रकार या ग्रुपवर सक्रिय आहेत. तुमच्या समस्या तुम्ही बिनधास्त मांडायच्या. कारवाई काय केली, याचाही फॉलोअप तुम्हाला मिळतो. पोलिस काम करतात की नाही, याची माहिती तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून द्यायची ही या ग्रुपची थीम आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा त्रास होत असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन या ग्रुपच्या माध्यमातून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले होते. 

टाईम रिस्पॉन्स..
एखाद्या पोलिस ठाण्यात नागरिकांनी माहिती दिल्यास पोलिस घटनास्थळी किती वेळात पोचतात, याची चाचणी सदस्यांकडून घेण्यात आली. अचानक एखाद्या पोलिस ठाण्यात फोन करून खून झाल्याची माहिती सांगायची आणि स्वतः घटनास्थळी थांबायचे. तेथे पोलिस किती वेळात पोचतात हे पाहण्यात आले. यामध्ये त्रुटी आढळलेल्या पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना समज देण्यात आली.

१०० क्रमांकावर टेस्टिंग
नागरिकांना पोलिसांची मदत पाहिजे असल्यास तातडीने १०० क्रमांकास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस वारंवार करतात. प्रत्यक्षात या क्रमांकावर फोनच उचलला जात नाही. अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशा तक्रारी होत्या. त्याचेही टेस्टिंग ग्रुपच्या सदस्यांकडून करण्यात आले. तेथेही वाईट अनुभव आला. त्यानंतर कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अशी आहे आचारसंहिता...
‘आयजी १००’ या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेज नसतात. कोणीही प्रबोधन करणारे, दुःखद घटनांचे मेसेज देत नाहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छाही नाहीत. तुम्ही एखादी तक्रार केल्यास तातडीने ‘नोटेड’ असा प्रतिसाद मिळतो. पुढे काय झाले याचीही माहिती देण्यात येते. त्यामुळे हा ग्रुप ‘टाईमपास ग्रुप’ होण्यापासून दूर राहिला आहे.

तक्रारी कमी झाल्या...
१० ऑगस्ट २०१६ ला हा ग्रुप तयार झाला. स्वतः विशेष पोलिस महानिरीक्षक  नांगरे-पाटील या ग्रुपवर आहेत. मटका, दारू बंद करण्याच्या तक्रारी अधिक आल्या. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, त्यांची बदली केली. फुलेवाडी परिसरातील अज्ञात वाहनांची नोंद ग्रुपच्या माध्यमातून घेऊन ते संबंधितांना परत केले. थेट जनतेचा आवाज पुढे येत आहे, असे ॲडमिन पोलिस उपनिरीक्षक मधुरा कोराणे यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news whatsapp wine gambling