पांढऱ्या बावट्याची काठी...

सुधाकर काशीद
सोमवार, 16 एप्रिल 2018

कोल्हापूर - मलकापूरच्या पुढे वालूर फाट्यापासून काही अंतरावर कळकबनवाडी आहे. तेथून पुढे जंगलात एका उंचवट्यावर बावट्याची काठी म्हणून एक जागा आहे. ब्रिटिश काळापासून तेथे आजही दर २५ डिसेंबरला एका काठीवर पांढरा झेंडा (बावटा) फडकवला जातो. याचं कारण थक्क करणारे आहे.

कोल्हापूर - मलकापूरच्या पुढे वालूर फाट्यापासून काही अंतरावर कळकबनवाडी आहे. तेथून पुढे जंगलात एका उंचवट्यावर बावट्याची काठी म्हणून एक जागा आहे. ब्रिटिश काळापासून तेथे आजही दर २५ डिसेंबरला एका काठीवर पांढरा झेंडा (बावटा) फडकवला जातो. याचं कारण थक्क करणारे आहे.

बावट्याची काठी हे ठिकाण महसूल खात्याच्यादृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या महसुली मोजणीचा केंद्रबिंदू आहे. या बावट्याच्या काठीला महसूल खात्याच्या नकाशात खूप महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना असे म्हणतात, की या बावट्याच्या काठीजवळ उभे राहिले, की क्षितिजावर पाच जिल्ह्यांच्या हद्दीचे दर्शन घडते. आता ही बावट्याची काठी आपल्याला पाहणे शक्‍य होणार आहे.

बावट्याची काठी कोठे कोठे?
मलकापूर, वालूर फाटा, नवीन धोपेश्‍वर, धनगरवाडा, कळकबनवाडी व तेथून पुढे ही बावट्याची काठी आहे. उंच कातळावर दगडाची गरड करून त्यावर पांढरा ध्वज लावला जातो. तेथून क्षितिजावर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमांचे दर्शन घडते. येथे भन्नाट वारा वाहतो. वाऱ्याचा आवाज काय असतो, याचा खरा अनुभव फक्त येथे येतो. आजूबाजूला गवे व इतर वन्यजीवांचा नैसर्गिक वावर आहे.
 

महसुलाची हद्द मोजणी कोठून सुरू करायची, यासाठी काही जागा निश्‍चित केलेल्या असतात. महसुली भाषेत त्याला मापे टाकण्याची जागा म्हणून ओळखतात. या जागा नकाशे तयार करताना ब्रिटिश प्रशासनाने निश्‍चित केल्या. त्यापैकी एक जागा म्हणजे बावट्याची काठी ही जागा आहे.

डिसेंबर महिन्यात योगायोगाने या परिसरात जंगल पर्यटनासाठी डॉ. अमर अडके गेले. तेव्हा तेथे त्यांना एका उंचवट्याच्या ठिकाणावर पांढरा झेंडा व शाहूवाडी महसूल विभागाचे कर्मचारी दिसले. त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, ही जागा पांढऱ्या बावट्याची जागा असल्याचे व ही जागा केंद्रबिदू धरूनच महसूल मोजणी होत असल्याचे सांगितले.

ही जागा पाचही जिल्ह्यांत उंचावर असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्थानिक लोकही या परिसराला बावट्याची काठी म्हणूनच ओळखतात. आता या माहितीला अधिक जोड मिळावी, यासाठी डॉ. अडके आधुनिक तंत्रज्ञान व या क्षेत्रातील काही ज्येष्ठ अभ्यासकांचे मार्गदर्शन घेणार आहेत व या ठिकाणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणार आहेत. त्यासाठी त्यांनी २९ एप्रिलला पदभ्रंमती मोहिमेचेही आयोजन केले आहे. ट्रेकर शैलेश भोसले यांचे निधन झाले. त्यांना या स्मृती मोहिमेने अभिवादन केले जाणार आहे.

बावट्याच्या काठीला अभ्यास करणार
कोल्हापूरच्या पश्‍चिमेस जंगल आहे, घाट आहे, अभयारण्य आहे, धनगरवाडे आहेत. पर्यावरण निसर्गाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा आहे. पण बावट्याची काठी यासारखी ठिकाणे महसुली क्षेत्राच्या मोजणीची किंबहुना त्याकाळी तयार झालेल्या नकाशाची केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे जंगल, निसर्ग, प्राणी, पक्ष्यांइतकेच या बावट्याच्या काठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. अडके यांनी दडलेली ही माहिती प्रथमच सर्वसामान्य लोकांसाठी खुली केली आहे. अर्थात ते व त्यांचे सहकारी त्याचा पुढील अभ्यासही करणार आहेत. 

 

Web Title: Kolhapur News white flag spot special story