महालक्ष्मीच्या मूर्तीवर पांढरे डाग - डॉ. सुभेदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुरातत्त्व विभागाशी चर्चा करून पुढील कार्यवाही

पुरातत्त्व विभागाशी चर्चा करून पुढील कार्यवाही
कोल्हापूर - श्री महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत आहे; मात्र मूर्तीवर काही प्रमाणात पांढरे डाग पडल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांनी सोमवारी सांगितले. मंदिरात मूर्तीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मूर्तीबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आली; मात्र चार दिवसांपासून मूर्तीची झीज होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. रासायनिक संवर्धन प्रक्रियेवरच आक्षेप घेतला जाऊ लागला. या पार्श्‍वभूमीवर अविनाश सुभेदार यांनी आज सकाळी मूर्तीची पाहणी केली. ते म्हणाले, ""संवर्धन प्रक्रियेबाबत श्रीपूजक व देवस्थान अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. मूर्तीची सध्याची स्थिती व संवर्धन प्रक्रियेच्या वेळची स्थिती यांचा अभ्यास करणार आहे. मूर्तीवरील पांढरे डाग हे नैसर्गिकरीत्या आहेत, की नियमांचे पालन न केल्यामुळे आले आहेत, याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.''

आर्द्रता नियमांचे पालन
मंदिराच्या गाभाऱ्यातील आर्द्रता नियंत्रणात राहावी, यासाठी श्रीपूजकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जाते. मूर्तीवरील पांढऱ्या डागांस श्रीपूजकच जबाबदार असल्याचा चुकीचा आरोप काही घटकांकडून केला जात आहे. मूर्तिसंवर्धन प्रक्रिया गोपनीय होती, ती उत्तम प्रकारे राबवली गेली असली, तरी त्यात काही त्रुटी राहिल्या असण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वी संवर्धन प्रक्रिया राबवली गेली. मागील मे महिन्यात मूर्तीवर कोटिंग करण्यात आले. प्रत्येक दोन वर्षांनी मूर्तीवर लेपन करावे लागेल, असे पुरातत्त्व विभागाने अगोदरच स्पष्ट केले असल्याचे ऍड. केदार मुनीश्‍वर यांनी सांगितले.

देवस्थान समिती, श्रीपूजक जबाबदार
जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीवर पांढरे डाग असल्याचे पाहणीदरम्यान मान्य केले आहे. देवस्थान समिती व श्रीपूजकांनी नियमांचे पालन न केल्यानेच हा प्रकार घडला आहे. गाभाऱ्यात जास्त लोकांनी प्रवेश केल्यास कार्बन डाय- ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे गाभाऱ्यातील मूर्तीवर परिणाम होत असावा, असा स्पष्ट आरोप प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला आहे.

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मूर्तीवर आढळलेल्या पांढऱ्या डागांची सोमवारी पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार.

Web Title: kolhapur news white spot on mahalaxmi murti