छीऽऽ थूऽऽ!! दारूसाठी एवढी लाचारी! 

निखिल पंडितराव
बुधवार, 21 जून 2017

कोल्हापूर - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या कचऱ्यातील खाद्यपदार्थांच्या आशेमुळे कुत्र्यांचा वावर वाढला. कुत्र्यांच्या हल्ल्यात काही जणांनी आपले प्राण गमावले. अनेक जण जखमी झाले, प्रश्‍न मात्र जैसे थे... पंचगंगा नदीच्या प्रदूषणात सर्वाधिक वाटा महापालिकेचा... पण अद्याप सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षम नाही... असे अनेक मूलभूत व पायाभूत प्रश्‍न प्रलंबित असताना आज महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी दारू दुकानदारांच्या प्रश्‍नांवर रस्ते हस्तांतर करण्यासाठी दाखवलेला आक्रमकपणा म्हणजे "छीऽऽ थूऽऽऽ!! दारूसाठी लाचारी' असल्याचाच प्रकार म्हणावा लागेल.

कोल्हापूर - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या कचऱ्यातील खाद्यपदार्थांच्या आशेमुळे कुत्र्यांचा वावर वाढला. कुत्र्यांच्या हल्ल्यात काही जणांनी आपले प्राण गमावले. अनेक जण जखमी झाले, प्रश्‍न मात्र जैसे थे... पंचगंगा नदीच्या प्रदूषणात सर्वाधिक वाटा महापालिकेचा... पण अद्याप सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षम नाही... असे अनेक मूलभूत व पायाभूत प्रश्‍न प्रलंबित असताना आज महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी दारू दुकानदारांच्या प्रश्‍नांवर रस्ते हस्तांतर करण्यासाठी दाखवलेला आक्रमकपणा म्हणजे "छीऽऽ थूऽऽऽ!! दारूसाठी लाचारी' असल्याचाच प्रकार म्हणावा लागेल. स्वच्छ कारभाराच्या आणाभाका घेऊन सत्तेवर आलेल्या या नगरसेवकांनी दारूसाठी एवढी अगतिकता दाखवल्याने यांच्या कारभाराची दिशाच स्पष्ट झाली. 

महामार्ग आणि राज्यमार्गापासून 500 मीटरवर असलेली दारू दुकाने आणि बार बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने शहरातील अनेक दारूची दुकाने बंद झाली. ही दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी हे रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्याची टुम काढण्यात आली आणि खऱ्या अर्थाने अनेक दिवस "डाव' न मिळालेल्या सदस्यांनी मोठा डाव खेळण्याचे गणित आखले. दारूसाठी बैठका घेऊन, गणिते फिक्‍स करून आज महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत हा ठराव सत्ताधाऱ्यांनी मंजूर करूनही घेतला. दारूच्या दुकानासाठी, बारसाठी लोकप्रतिनिधींनी लाचारी पत्करून आपली कुवतच दाखवून दिली आहे. दारूमुळे नागरिकांचे कोणते प्रश्‍न सुटणार आहेत, कोणाचा विकास साधणार आहे, अशा प्रश्‍नांची चाचपणी केल्यास दारूमुळे अनेकांची संसार धुळीसच मिळाल्याचे समोर येईल. 

दारूबंदीची चळवळ ज्या जिल्ह्यात रुजली आणि राज्यभर गेली, त्याच ठिकाणी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आज महापालिकेच्या सभेत दाखवलेली तत्परता ही नेमका कोणाचा विकास साधणारी आहे की, समाजाला आणखी बिघडवण्यासाठी उचललेले पाऊल आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आज खरोखरच आली आहे. आज ठराव मंजूर झाला, म्हणजे सगळे झाले असे नाही; परंतु आज सगळी ताकद लावून हा ठराव जणू कोल्हापूरच्या विकासाचा चेहरामोहरा असल्यासारखा मांडून राडा घालण्यात आला. 

शहरातील लोकांशी निगडित अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. कचऱ्याचा प्रश्‍न आहे, नदी प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर, महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा नाही. उपचाराविना गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पिण्याचे पाणी येत नाही. गटारी तुंबून त्याची घाण अनेकांच्या घरात जात आहे. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहून नागरिकांना चालणे कठीण झाले आहे... असे अनेक मूलभूत व पायाभूत सुविधांचे प्रश्‍न पडून असताना दारूसाठी लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता निश्‍चितच अनेकांच्या डोक्‍याची मती गुंग करणारी ठरणारी आहे. दारूसाठी ज्या पद्धतीने लाचारी या लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे, तीच आता लोकांच्या विकासाच्या प्रश्‍नांवरही दाखवावी आणि त्यांच्या नेत्यांनीही याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

दारूसाठीच का? 
महापालिकेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. सत्तेवर येताना यांनी व नेत्यांनी लोकांना विकासाची स्वप्ने दाखविली व तशी भाषणेही केली. लोकांनी विकासाच्या प्रश्‍नांवर त्यांनी मतदान करून सत्ता दिली; परंतु विकास राहिला बाजूला आणि ज्या दारूमुळे अनेकांची संसार उधळले गेले, अनेकांच्या आयुष्यांची वाताहत झाली, अशा लोकांसाठी सत्ताधाऱ्यांनी आज दाखविलेला धडाडीपणा निश्‍चितच नागरिकांना संताप आणणारा आहे, हे निश्‍चित.

Web Title: kolhapur news wine