गडहिंग्लज तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

गडहिंग्लज -  औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे वीज कोसळून संगीता सचिन नाईक (वय 36) यांचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, तालुक्‍यातील अरळगुंडी येथेही वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला. 

गडहिंग्लज -  औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे वीज कोसळून संगीता सचिन नाईक (वय 36) यांचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, तालुक्‍यातील अरळगुंडी येथेही वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला. 

गेल्या आठवड्यातील पावसानंतर चार दिवस वातावरण कोरडे होते. यामुळे सोयाबीन मळणी उरकून घेण्यात शेतकरी धडपडत आहेत. आज सकाळपासून नाईक कुटूंबीय शेतातील सोयाबीन कापणी करीत होते. दुपारनंतर मळणी सुरू होती. सव्वा तीनच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. मळणी पावसात सापडू नये म्हणून सर्वांची धावपळ सुरू होती. इतक्‍यात वीजांचा कडकडाट व जोराचा पाऊस आला. सोयाबीनचा भारा मळणी मशिनजवळ टाकून परतत असताना वीज संगीता यांच्या अंगावर कोसळली. त्यावेळी त्यांच्या शेजारी असलेले पतीसह अन्य तिघेजण धक्‍क्‍याने बाजूला फेकले गेले. संगीता बेशुध्द झाल्या होत्या. त्या काळ्या निळ्या पडल्या होत्या. त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. 

दरम्यान, अरळगुंडी येथील शिवाप्पा वाळकी तीन जनावरे शेताकडे घेवून गेले होते. दुपारी पाऊस सुरू झाल्याने जनावरे घरी आणत असताना दोन म्हैशी पुढे गोठ्यात गेल्या. शेवटी असलेल्या म्हशीवर वीज कोसळली. त्यात ती म्हैस जागीच ठार झाली. यामुळे वाळकी यांचे साठ हजाराचे नुकसान झाले आहे. 

Web Title: kolhapur news women death due to lightening