पेन्सिल पाटीवर कमी... पोटातच जादा

सुधाकर काशीद 
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शाळेत पाटीचा वापर कमी झाला आणि त्यामुळे पेन्सिलचा वापर कमी झाला आहे. काही प्राथमिक शाळा सोडल्या तर पुढे पुऱ्या शिक्षणात पाटी पेन्सिलचा वापरच नाही. तरीपण अजूनही पेन्सिली का खपतात आणि विशेषतः मुली आणि मध्यमवयीन महिलाच पेन्सिली का खरेदी करतात, हा आता चर्चेचा विषय झाला आहे. अक्षराची ओळख करून देणाऱ्या या पेन्सिली आता मुली आणि महिलांच्या खाण्यातली एक ओळख झाली आहे. हळूच पेन्सिल कुडतरायची व चघळत चघळत चवीने खायची ही सवय वाढली आहे. म्हटलं तर आरोग्याशी निगडीत हा गंभीर विषय आहे; पण खूप हलक्‍या फुलक्‍या अंगाने त्याकडे पाहिले जात आहे. 

काही शालेय स्टेशनरी (पेन्सिल, रंगपेटी) विकणाऱ्या विक्रेत्यांच्या ध्यानात हा विषय आला. शाळेतली मुले रोज पेन्सिल खरेदीस आले तर ते समजण्यासारखे आहे; पण काही मुली, मध्यमवयीन महिला रोज पेन्सिल का खरेदी करतात, याकडे लक्ष ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. 

लहानपणी पेन्सिल खाण्याची सवय असते. मात्र मोठेपणीही ही सवय म्हणजे त्यांच्या शरीरातील आयर्न, झिंक, कॅलशियम, मॅगनेशियम किंवा प्रथिने कमी असल्याचे लक्षण मानले जाते. विशेषतः महिलांत ॲनिमिया विकाराचे प्रमाण वाढते आहे. त्यातून अशा सवयी लागत आहेत. रक्तातील आयर्न, झिंक, कॅलशियम, मॅगनेशियम किंवा अन्य पूरक घटक कमी झाले की भुकेचे केंद्र वेगळ्या माध्यमातून उद्दिपीत होते व पेन्सिल, खडू, माती खाण्याची इच्छा होते. 

यासंदर्भात काही पेन्सिल विक्रेत्यांनी निरीक्षणे टिपली. अंकुश वाघापूरकर यांनी सांगितले की, माझ्या दुकानात काही तरूण मुली महिला नियमित पेन्सिल खरेदी करतात. सुरवातीला मला त्यात वेगळे काही वाटले नाही; पण कॉलेजला जाणाऱ्या या मुली किंवा गृहिणी पेन्सिल खरेदी करून पुढे काही अंतरावर जाऊन त्याचा तुकडा तोंडाने तोडतात व चघळतात हे ध्यानात आले. आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याने याकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी शरिरात कॅल्शियम, मॅगनेशियम, झिंक, आयर्न याची कमतरता हे पेन्सिल खाण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. कमतरतेमुळे मुलींच्या शरीरात बारीक जंत तयार होतात. रक्ताचे प्रमाण त्यामुळे कमी होते व काहीतरी वेगळे खायची इच्छा होते. पेन्सिल, खडू हे सहज मिळणारे, बिनधोक आहे, असे वाटणारे खाद्य त्या खातात. ते शरीराला घातक आहे. अर्थात हा कुटुंबातील लोकांनी लक्ष ठेवण्याचा विषय आहे. 

आमच्या दुकानात पेन्सिलसाठी तरुणीच मोठ्या ग्राहक आहेत. या तरुणी पहिल्यांदा दबकत दबकत पेन्सिल घ्यायचा. आता बिनधास्त घेतात. पेन्सिलीचा तुकडा उघडपणे चघळतात. चुइंगमसारखाच हा एक विचित्र प्रकार झाला आहे. 
- सूर्यकांत गायकवाड, शालेय साहित्य विक्रेते, खरी कॉर्नर

आता मुली पेन्सिली खातात. अगोदर मातीच्या बारीक गुठळ्या खायच्या. यातल्या बहुतेक मुलींच्या पोटात जंत असतात. काही महिलाही पेन्सिल खातात. वास्तविक शरीरात काही घटक कमी आहेत, याचे हे लक्षण आहे. चांगले उपचार झाले की ही सवय सुटू शकते. 
- डॉ. शिरीष पाटील

या प्रकाराला पायका (Pica) म्हणतात. तरुणी व महिलांत झिंक, आयर्नचे प्रमाण कमी झाले की त्यांच्या भुकेच्या संवेदनाच बदलतात. मग त्या खडू, पेन्सिल खाऊ लागतात. ही सवय शरीराला अपायकारक आहे. वास्तविक घरात अशाप्रकारे पेन्सिल खाणारी कोणी असेल तर तिला ताबडतोब तज्ज्ञांकडे उपचारासाठी न्यावे. 
- डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोगतज्ज्ञ

Web Title: kolhapur news women health chalk pencil