होय... ॲनिमेशन इंडस्ट्री कोल्हापुरात शक्‍य...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर  -  मुंबई-पुणे आणि हैदराबाद-बंगळूर-चेन्नईव्यतिरिक्त ॲनिमेशनची बाजारपेठ पश्‍चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापुरात उभी राहू शकते, असा विश्‍वास राजेश खेले, दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजय दळवी यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर  -  मुंबई-पुणे आणि हैदराबाद-बंगळूर-चेन्नईव्यतिरिक्त ॲनिमेशनची बाजारपेठ पश्‍चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापुरात उभी राहू शकते, असा विश्‍वास राजेश खेले, दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजय दळवी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेली सव्वीस वर्षे या क्षेत्रात श्री. खेले कार्यरत असून ते ॲनिमेशनवाला डॉट कॉमचे संचालक आहेत. प्राचार्य दळवी वारंवार येथे ॲनिमेशन कंपन्यांना निमंत्रित करून कॅंपस इंटरव्ह्यूचे आयोजन करतात. 
पॅरिसमध्ये ग्रेव्हीन म्युझियममध्ये २८ ऑक्‍टोबर १८९२ रोजी चार्ल्स इमाईल रेनॉड्‌स यांच्या जगातल्या ऐतिहासिक पहिल्याच ॲनिमेशनपट निर्मितीचे प्रदर्शन झाले. ‘दि असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म्स द ॲनिमेशन’ म्हणजेच ‘असिफा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने हा दिन आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन म्हणून पन्नासहून अधिक देशात हजाराहून अधिक इव्हेंट्‌समधून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. 

राजेश खेले म्हणाले, ‘‘पंचवीस वर्षांपूर्वी डायरेक्‍ट ३५ एमएम फिल्मवर ॲनिमेशन चित्रित होत असे. २००८ नंतर मोबाइल तंत्रज्ञानाने ॲनिमेशनचा प्रेक्षकवर्ग वाढला आणि व्यवसायाच्या संधीही कैक पटींनी वाढल्या. परंतु मूळ ॲनिमेशनची निर्मिती अजूनही कथा, कथाकथन, चित्रशैली आणि ॲनिमेशनचे तंत्र यांभोवतीच फिरते आहे. आजही उत्तम साहित्य, नवीन विषय, नवीन चित्रशैली विविध वयोगटातील प्रेक्षकांना हवीहवीशी वाटते. संगणकाने आणलेला प्रॉडक्‍शनमधला बदल खूप सुखकारक आहे. निर्मिती मागील सृजन कौशल्य मात्र तेवढेच आव्हानात्मक राहिले आहे. ते पेलण्यातली मजा काही औरच आहे.’’

प्राचार्य अजय दळवी म्हणाले, ‘‘कलापूर कोल्हापूरने आजवर अनेक चित्रकार घडवले, पण आता त्याच्याही पुढे जाऊन ॲनिमेशनसारख्या क्षेत्रात हजारो संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशभरातून येथे विविध कंपन्यांनी गेल्या वर्षभरात घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक तरुणांना संधी मिळाली. कोल्हापूर ॲनिमेशन इंडस्ट्रीची जबाबदारी उचलू शकेल, असे वाटते. संगणक शिक्षणाबरोबरच विशेषतः आज जी मुले चित्रकलेच्या इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा देतात त्यांना हाताशी घेऊन भरीव काम करता येणे शक्‍य आहे. या कामात चित्रकला शिक्षकही त्या दृष्टीने मोलाची भर घालू शकतात आणि या क्षेत्रात कोल्हापूरचं टॅलेंट नक्कीच सर्वश्रेष्ठ आहे. मात्र पायाभूत सुविधांसाठी सर्वच घटकांचा पुढाकार आवश्‍यक आहे.’’ 

रोज साठ तास प्रक्षेपण!
भारतात आजमितीला किमान दहा टीव्ही चॅनेल्स दिवसातून सहा तास अनेक ॲनिमेशन फिल्म्स दाखवितात, म्हणजे ६० तास दिवसाला आणि अठराशे तास महिना इतकी मोठी मागणी ॲनिमेशन कार्यक्रमांना आहे. बहुतांशी ७० टक्के वेळेला परदेशी ॲनिमेटेड शोज ही मागणी पूर्ण करताना दिसतात. हीच मागणी भारतीय कथा, भारतीय चित्रशैलीवर आधारित आणि जमल्यास भारतीय सॉफ्टवेअरवर तयार केलेल्या ॲनिमेशन फिल्म्सने पूर्ण करता येणे शक्‍य आहे.

Web Title: Kolhapur news world animation day