एकत्र कुटुंबात नांदते समाधान

सुधाकर काशीद
मंगळवार, 15 मे 2018

आम्ही दोघे राजा-राणी असं राहण्यातही काहींना आनंद आहे; पण ३८ जणांचे एकत्र कुटुंब ही आयुष्यातली वेगळी गंमत हे कुटुंब आनंदाने अनुभवत आहे. वरणगे पाडळी (ता. करवीर) या गावातील शिंदे कुटुंबाच्या आगळ्यावेगळ्या एकत्रित वाटचालीची ही सुंदर कथा आहे.

कोल्हापूर - या घरात ३८ माणसे आहेत. ३० खोल्यांचे घर आहे. एका वेळी ५० भाकरी भाजण्यासाठी भली मोठी चूल आहे. घरची ४० एकर शेती आहे. दोन ट्रॅक्‍टर, एक जीप, मोटार, १५ मोटारसायकली दारात आहेत. घरात ऐश्‍वर्य भरलेले आहे; पण त्याहीपेक्षा समजूतदारपणा हा गुण या घरातल्या प्रत्येकाच्यात जणू जन्मतःच आला आहे. त्यामुळे ३८ माणसांचे हे कुटुंब एकत्रित कुटुंब पद्धतीचा एक आदर्श ठरले आहे. आम्ही दोघे राजा-राणी असं राहण्यातही काहींना आनंद आहे; पण ३८ जणांचे एकत्र कुटुंब ही आयुष्यातली वेगळी गंमत हे कुटुंब आनंदाने अनुभवत आहे. 

वरणगे पाडळी (ता. करवीर) या गावातील शिंदे कुटुंबाच्या आगळ्यावेगळ्या एकत्रित वाटचालीची ही सुंदर कथा आहे. दुभंगणारी घरे हा एक सामाजिक प्रश्‍न आजूबाजूला घोंघावत असताना शिंदे कुटुंबाने आपली वेगळी पायवाट अगदी ठरवून जपली आहे. वरणगे पाडळी गाव म्हणजे पंचगंगा नदीची सुरवात होणारे गाव. गावात बापूसाहेब पांडुरंग शिंदे यांचे घर आहे. बापूसाहेबांचे वय ८० च्या घरात. त्यांना ५ भाऊ, २ बहिणी. पाच भावांचे विवाह झाले आणि हे कुटुंब हळूहळू वाढत गेले; पण एकत्रित कुटुंब असेल तर प्रत्येकावर कमीअधिक जबाबदारी टाकून ४० एकर शेतीसह कुटुंबाचा व्याप सांभाळता येईल, हे सर्वांच्याच ध्यानी आले. 

आज लहानापासून मोठ्यांपर्यंत ३८ माणसे आहेत. भाकरी केल्या तर ५० आणि चपात्या केल्या तर २०० असा भाकरी, चपातीचा हिशेब आहे. भाताला कूकर नव्हे, तर चुलीवर पातेलीच ठेवावी लागतात, अशी परिस्थिती आहे. दर रविवारी मटण हा या घराचा खाक्‍या असल्याने ५ किलो मटण शिजविण्यासाठी घरातल्या तिघा-चौघा महिलांची राबणूक ठरलेली आहे. कपडे धुवायचे म्हटल्यावर रोज ५० कपडे, त्यामुळे त्यासाठीही महिलांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे. 

घरात ३८ माणसे, त्यामुळे महिन्याला एकदोघांचा वाढदिवस येतो आणि घरात गोडधोडाचा थाट उडतो. प्रत्येकाचा गोतावळा एवढा, की ५०० ताटांचा बेत आखावा लागतो. घरचा सर्व बाजार आठवड्याला करायचा, हे ठरून गेले आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरातील पुरुषांच्या चर्चेत बायकांनी आणि बायकांच्या चर्चेत पुरुषांनी लक्ष घालायचे नाही, हा नियम सर्वांनी लागू करून घेतला आहे. चुकून काही मान-अपमान घडला, तर समजूतदारपणा दाखवायची या घरातील सवय तर खूप मोलाची आहे.

एकमेकांना समजून घेतलं, तर काही अडचण येत नाही. आम्ही ३८ जण एका घरात. प्रत्येकाच्या मनात वेगळ्या काही कल्पना असतात. एकत्रित घराचा विचार करून, जे योग्य, तेच सर्वजण मान्य करतात. घरात ऐश्‍वर्य जरूर आहे; पण समाधानात जगणारे भाऊ-भावजयी, सर्वांची मुले, सर्वांच्या लेकी, सुना, नातवंडे, पणतवंडे आहेत; म्हणून घरात ऐश्‍वर्यापेक्षा अधिक मोलाचे समाधान नांदते आहे. 
- बापूसाहेब शिंदे 

 

Web Title: Kolhapur News world joint family Day special story