‘चला! चिमण्या वाचवूया’ बनली लोकचळवळ

‘चला! चिमण्या वाचवूया’ बनली लोकचळवळ

कोल्हापूर - आपापल्या परिसरातील चिमण्या मोजून त्याची नोंद ठेवण्याची मोहीम जगभरात गेल्या वर्षीपासून सुरू झाली. मात्र, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘चला, चिमण्या वाचवूया’ या मोहिमेतून जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वीच अशा पद्धतीचे डॉक्‍युमेंटेशन झाले. त्यातून चिमण्या पुन्हा अंगणात येण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. सहा वर्षांनंतर आता ही मोहीम एक लोकचळवळच बनली असून कोल्हापूरचे मॉडेल देशभरात विस्तारू लागले आहे. 

दरम्यान, जनजागृती आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जाणार असून भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियमच्या चोथ्याला पर्याय म्हणून नारळाच्या शेंडीपासून तयार केलेल्या आकर्षक चोथ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सहा वर्षांचा कृती कार्यक्रम 

‘सकाळ’ने सहा वर्षांपूर्वी २० मार्च २०१२ ला ‘चला, चिमण्या वाचवू या’ अशी साद कोल्हापूरकरांना घातली आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध अनुभव अनेक घटकांनी ‘सकाळ’सोबत शेअर केले. त्याशिवाय विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने साडेचार हजार घरट्यांचे वाटप ‘सकाळ’च्या पुढाकाराने झाले. २०१२ ते २०१५ या काळात अधिकाधिक चिमण्या अंगणात याव्यात, यासाठी विविध संकल्पना पुढे आणून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. चित्र, छायाचित्र प्रदर्शनाबरोबरच स्लाईड शोंचे विविध ठिकाणी आयोजन झाले. त्यानंतर सलग दोन वर्षे सोशल मीडियावरून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली गेली आणि ही मोहीम संपूर्ण जगभरात पोचली. जगभरातील विविध ठिकाणी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक असलेली मराठी तरुणाईही या मोहिमेत सक्रिय सहभागी झाली. 

सकारात्मक परिणाम

  • घराच्या परिसरात चिमण्या व इतर पक्षांसाठी हक्काचा निवारा देण्याची मानसिकता वाढली. 
  • टेरेस बागेत चिमण्या व पक्ष्यांसाठी विविध सुविधा देताना फूडकोर्ट, वॉटर-ज्युस सेंटर, स्विमिंग सेंटर अशा संकल्पना राबवल्या जाऊ लागल्या.
  • आर्किटेक्‍ट व बांधकाम व्यावसायिकांनी घर बांधकामाचे प्लॅन्स बनवतानाच चिमण्या व पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्‍यक डिझाइन्स तयार केली. अनेकांनी ती प्रत्यक्षात अमलात आणली. 
  • चेतना विकास मंदिर शाळेत तयार झालेली घरटी ‘अनाम प्रेम’ यासारख्या संस्थांच्या माध्यमातून काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेली. या शाळेतून महिन्याला किमान तीस घरटी जातात. 
  • कुंभार गल्ल्यांत खास चिमणी व इतर पक्ष्यांसाठी मातीची पराळं (जलपात्रे) तयार होऊ लागली. 
  • निसर्गमित्र संस्थेने प्रबोधनाबरोबरच कृती कार्यक्रमांवर अधिक भर दिला. भांडी घासण्यासाठी घराघरात ॲल्युमिनियमच्या चोथ्याचा होणारा वापर कमी करण्यासाठी नारळाच्या शेंडीपासून आकर्षक चोथे तयार केले आहेत. चेतना विकास मंदिर आणि निसर्गमित्र या दोन प्रातिनिधिक संस्था; मात्र समाजातील अनेक घटक आता या मोहिमेंतर्गत विविध संकल्पना पुढे आणू लागले आहेत.

भोपळ्यापासूनही घरटी
चिमण्या अंगणात याव्यात, यासाठी चेतना शाळेसह विविध संस्थांनी तयार केलेली घरटी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. आजही अशा घरट्यांना मोठी मागणी आहे. वाळलेल्या भोपळ्यापासूनही आता घरटी तयार केली जाणार आहेत. निसर्गमित्र संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला असून, उद्या (मंगळवारी) घरटी बनवण्याची आणि नारळाच्या शेंडीपासून चोथा तयार करण्याची कार्यशाळा होणार आहे. विद्यापीठ हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यशाळेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com