थॅलेसेमियाकडे दुर्लक्ष नको!

थॅलेसेमियाकडे दुर्लक्ष नको!

थॅलेसेमिया समजून घेऊ या!
वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे आई-वडिलांकडून मुलांना अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. या गुणधर्मांचे एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमण होते. बीटा थॅलेसेमिया व्याधीमध्ये बिटा थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांकडून अपत्यात येतात. काही वेळा दोघांकडून हे जनुक येते. परिणामी होणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते.

कोल्हापुरातील स्थिती
थॅलेसेमियाबाबत धनंजय नामजोशी म्हणाले, ‘‘रक्तपुरवठा करण्यासाठी सुरू केलेल्या विविध व्हॉटस्‌अप ग्रुपवर आम्ही कार्य करत होतो, पण रक्ताशी निगडित असणाऱ्या या आजाराबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. जेव्हा आम्हाला थॅलेसेमियाबद्दल समजले, तेव्हा आम्ही हा आजार असणाऱ्या रुग्णांशी संपर्क साधला. आमच्यासमोर ही संकल्पना राजकुमार राठोड यांनी मांडली. राठोड यांची स्वत:ची आठ वर्षाची मुलगी ही थॅलेसेमियाग्रस्त आहे. पण राठोड यांनी स्वत:ला जे दु:ख भोगावे लागले, ते इतरांना लागू नये, यासाठी संपूर्ण राज्यात थॅलेसेमिया निर्मूलनासाठी समिती स्थापन केली. यानंतर आम्ही कोल्हापूर जिल्हा थॅलेसेमिया निर्मूलन समिती सुरू केली.’’ 

उपचार 
आजाराच्या तीव्रतेनुसार दर तीन ते सहा आठवड्यांतून एकदा रक्त स्वीकारावे लागते. रक्त देताना दर रक्त स्वीकारण्यापूर्वी हिमोग्लोबीन १०.५ ग्रॅम ठेवावे लागते. नियमित रक्त स्वीकारले आणि हिमोग्लोबीनचे प्रमाण १०.५ ठेवले तर रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांनी जेव्हा थकवा येतो, तेव्हा रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्यावी. हे हिमोग्लोबीन आठ ते नऊ टक्के असावे. फेरोटीनचे प्रमाण एक हजारपेक्षा जास्त वाढले तर ते कमी करण्यासाठी गोळ्याही घ्याव्यात. याबरोबर रक्त चढविताना काही आजाराचे जीवाणू शरीरात गेल्यास लसीकरण करून घ्यावे. व्हिॅटमिन बी, कॅल्शियम घ्यावे. तीन ते सहा महिन्यांनी रक्तचाचण्या करून घेतल्या पाहिजेत. 
- डॉ. वरुण बाफना,
   हेमॅटोलॉजिस्ट

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना नियमित रक्तसंक्रमण करावे लागते. यासाठी सर्वच रक्तपेढ्यांतून मोफत रक्तपुरवठा केला जातो. अशा रुग्णांची नोंद राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडे केली जाते. रुग्णांना राज्य परिषदेकडून ओळखपत्र दिले जाते. त्यासंदर्भानुसार थॅलेसेमिया रुग्णांना शासकीय, निमशासकीय, खासगी रक्तपेढ्यांनीही मोफत रक्तपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
- प्रकाश घुंगुरकर, अध्यक्ष, जीवनधारा ब्लड बॅंक 

शासकीय रुग्णालयात ज्या तपासण्या होत नाहीत किंवा ज्या तपासण्या मुंबईसारख्या ठिकाणी कराव्या लागतात, त्या तपासण्यांच्या खर्च आम्ही अशा रुग्णांसाठी करतो. समितीमार्फत गावांमध्ये तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती सुरू आहे. थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्त, आरोग्य तपासणी केली जाते. बाहेरील महागडी औषधे असतील तर त्याचीही व्यवस्था केली जाते. 
- धनंजय नामजोशी, अध्यक्ष, थॅलेसेमिया निर्मूलन समिती

असा हा थॅलेसेमिया

  •  थॅलेसेमियाचे उत्तर भारत, कर्नाटकात प्रमाण अधिक  
  •  निदान एचबी इलेक्‍ट्रोफोरेसिस तपासणीने शक्‍य 
  •  या तपासणीत फिटल हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढलेले आढळल्यास नेमके निदान लवकर होते. 
  •  बिटा थॅलेसेमिया दोन प्रकारचा असतो. एक मायनर, दुसरा मेजर
  •  बीटा थॅलेसेमिया मेजरची लक्षणे लहान बाळांत वयाच्या तीन ते सहा महिन्यांदरम्यान दिसतात. 
  •  सौम्य स्वरूपातील रुग्णांना फक्त शरीरावर जास्त ताण आल्यास ॲनिमिया होतो. 
  •                तीव्र स्वरूपातील ६ ते १८ महिन्यांत लक्षणे दिसतात. यात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते.
  •  लिव्हर आणि प्लीहा वाढत जाते, हाडे ठिसूळ होतात. 
  •  हाडांतील काही बदल चेहऱ्यावर दिसतात. कपाळाचे हाड पुढे येते. नाक चपटे दिसते. दात पुढे येतात. 
  •  निदान झाल्यानंतर रक्त घेण्यास सुरुवात न केल्यास मृत्यूही येतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com