इडली-वडा..संसाराचा गाडा..

इडली-वडा..संसाराचा गाडा..

कोल्हापूर - रोज पहाटे चार वाजता यांचा दिवस सुरू होतो. इडली, वड्याच्या पिठाचा गरगराट सुरू होतो. सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा छोटा टेम्पो महावीर उद्यानाजवळ येतो आणि तेथून पुढे सकाळी दहा वाजेपर्यंत इडली, वडा खाणाऱ्या खवय्यांच्या गराड्यात त्यांचा हात एखाद्या यंत्रासारखा हलू लागतो. गरम गरम इडली आणि वड्याची ऑर्डर घेता घेता यांना घाम फुटतो. पण जराही गडबड, गोंधळ न होता, त्यांचा व्यवसाय सहा तासांत किमान चारशे जणांना तृप्त करून त्या दिवसापुरता थांबतो.

कोल्हापुरात महावीर उद्यानाजवळ रोज सकाळी सात ते दहा वेळेतच इडली, वड्यासाठी अक्षरश: रांग लागणाऱ्या कोमल विजय कमलाकर यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जिद्दीची ही कथा आहे. महिलांच्या वाट्याला कष्ट जरूर असते; पण आसपासच्या परिस्थितीचा, बदलत्या गरजांचा अभ्यास करून महिला एखाद्या व्यवसायात उतरल्या तर त्या अक्षरश: क्रांती कशी करू शकतात, याचेही हे उदाहरण आहे. 

महिलांनी थोडी मानसिकता बदलून परिस्थितीला सामोरे गेले, तर यश फार लांब नाही. आम्ही रस्त्याकडेला इडली, वडा विकतो म्हटल्यावर हे हलके काम समजून काहींनी नाके मुरडली; पण नाके मुरडणाऱ्यांकडे लक्ष द्यायचे नाही. जग काय म्हणेल असली चिंता तर अजिबात करायची नाही, अशी भूमिका घेतल्यामुळेच आज आमच्या इडलीला कोल्हापुरात मान आहे. आणि तो मान कष्टाचा आहे.
- कोमल विजय कमलाकर

महावीर उद्यानाजवळ एका हॉलची देखरेख व सफाई काम करत विजय कमलाकर त्यांची आई, भाऊ तानाजी, पत्नी कोमल राहात होते. वॉचमन कम मुकादम अशा स्वरूपाच्या या नोकरीत तुटपुंजीच मिळकत होती. त्यामुळे विजयची आई व पत्नी कोमल यांनी काहीतरी उदरनिर्वाहाचे वेगळे साधन म्हणून हातगाडीवर इडली, वडा विक्री सुरू केली. पटणार नाही, सुरुवातीला कशाबशा पंधरा ते वीस इडल्या खपायच्या. 
पण महिलांच्या हातात चवीची एक अदृश्‍य ताकद असते. तशीच ताकद या दोघींच्या हातात होती व त्या ताकदीवर त्यांनी इडली व वड्याला एक छानशी चव मिळवून दिली आणि बघता बघता आज आठ वर्षांत त्यांच्या इडलीची चव कोल्हापूरकरांच्या जिभेवर जाऊन पोहोचली. आज महावीर उद्यानाजवळ जशी सकाळी फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते, तेवढीच गर्दी इडली, वडा खाण्यासाठी असते. विजय, कोमल, सोनल, तानाजी, लक्ष्मी अशा पाचजणांना खवय्यांची गर्दी आवरावी लागते. 

यातल्या इडली, वड्याच्या चवीचा भाग वेगळा. पण महिलांची जिद्द किती परिणामकारक असू शकते, याचे हे उदाहरण आहे. या महिला रोज पहाटे चार वाजता त्यांच्या तयारीला लागतात. टेंपो घेऊन महावीर उद्यानाजवळ येतात. टिप्पीरा असणारी इडली व त्यासोबत खाईल तेवढी चटणी खवय्यांना देतात. एका वेळी दहा ते पंधराजण डिशसाठी हात पुढे पुढे करतात. पण दादा, मामा, भाऊ, काका एक मिनिट, एक मिनिट असे करत करत दहा वाजेपर्यंत स्वत:ला पूर्णत: वाहून घेतात. त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या कामाला लागतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com