दि अन्‌काऊंटेड पीपल..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

कोल्हापूर - त्यांना हजेरीपुस्तक नाही, मुकादम नाही, उन्हातान्हाची पर्वा नाही. वेतन, निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी, प्रसूतीची रजा, ओव्हरटाईम, आजारी रजा, किरकोळ रजा हा प्रश्‍न तर लांबचाच. तरीही शहराच्या कचऱ्यात त्यांचे हात दिवसभर मळत असतात. मात्र या खऱ्या स्वच्छतादूतांना अद्यापही सन्मानाची लढाई लढावीच लागते. 

कोल्हापूर - त्यांना हजेरीपुस्तक नाही, मुकादम नाही, उन्हातान्हाची पर्वा नाही. वेतन, निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी, प्रसूतीची रजा, ओव्हरटाईम, आजारी रजा, किरकोळ रजा हा प्रश्‍न तर लांबचाच. तरीही शहराच्या कचऱ्यात त्यांचे हात दिवसभर मळत असतात. मात्र या खऱ्या स्वच्छतादूतांना अद्यापही सन्मानाची लढाई लढावीच लागते. साहजिकच हा विषय आता लघुपट निर्मिती क्षेत्रातील नव्या पिढीला आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच त्यांच्याकडून अशा विषयांवर मोठ्या प्रमाणावर कलाकृती निर्माण होऊ लागल्या आहेत.  

ऊन-पावसाची पर्वा न करता दिवसभराच्या भटकंतीनंतर मिळणाऱ्या प्लास्टिक, पत्रा, काच वेगळे करून ते जुन्या बाजारात विकायचे आणि त्यातून मिळणाऱ्या शंभर-दोनशे रुपयांतून पोटाची धगधगती आग विझवायची आणि संसाराचा गाडा चालवायचा, हा या कचरावेचक महिलांचा नित्यनेम. मुळात त्यांच्या नशिबी

दारिद्र्य आणि नवऱ्याची व्यसने पाचवीलाच पुजली आहेत. विविध देशांत कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या महिलांनी स्वतःचे गट स्थापन करून कचऱ्यापासून नवीन निर्मितीचे लहान-मोठे उद्योग सुरू केले आहेत. बंगळूर व लातूरमध्ये अशा प्रकारचे लक्षणीय प्रयोग झालेले आहेत. या बदलामुळे कष्टकरी महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. कचऱ्यापासून निर्मिती उद्योगात उतरलेल्या महिला इतर गरजू महिलांना मदतीसाठी सोबत घेतात. त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळतो आहे. 

आठ वर्षांपूर्वीचे चित्र...
सायबर कॉलेजमधील डॉ. दीपक भोसले यांनी आठ वर्षांपूर्वी कचरावेचक महिलांवर शोधप्रबंध सादर केला होता. या प्रबंधावर आधारित ‘दि अन्‌काऊंटेड पीपल’ हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले. त्यांच्या अभ्यासानुसार त्यावेळी १९ ते २९ वयोगटातील महिलांचे प्रमाण अधिक होते. त्यातील ७१.२ टक्के महिला विवाहित आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या तर ६९.२ टक्के महिला मनोरंजनावर भर देतात. सुमारे ४८ टक्के महिला सोन्याचे दागिने मिळत नसले तरी कृत्रिम दागिने वापरून हौस करतात. एकूणच कचऱ्यातून त्यांचा संसार फुलत असला तरी डॉ. भोसले यांच्या मतानुसार आठ वर्षांनंतर काही अंशी चित्र बदलले असले तरी अशा महिलांच्या सन्मानासाठी प्रत्येक घटकाचा पुढाकार आवश्‍यक आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या ठिकाणी अशा महिलांची अधिवेशने सुरू आहेत. त्यांची न्याय हक्क मागण्यांसाठी लढाई सुरू आहे. कोल्हापुरात ‘एकटी’ संस्थेच्या माध्यमातून आता अशा महिलांसाठी विविध उपक्रम सुरू झाले आहेत. ही एक नांदी असली तरी अशा उपक्रमांना पाठबळ देताना ते अधिक व्यापक करावे लागणार आहेत. त्यासाठी महिला दिनासारखा चांगला मुहूर्त तो कोणता?
 

Web Title: Kolhapur News world womens day special