‘भांडणापेक्षा समझोता बरा’चा रुजवला मंत्र..

गणेश शिंदे
गुरुवार, 8 मार्च 2018

जयसिंगपूर - ‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन कुरुंदवाड येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक प्रियांका राजेश देवर्षी यांनी ५ वर्षांत तब्बल ४१६ संसार मोडता मोडता सावरले आहेत.

जयसिंगपूर - ‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन कुरुंदवाड येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक प्रियांका राजेश देवर्षी यांनी ५ वर्षांत तब्बल ४१६ संसार मोडता मोडता सावरले आहेत. अनेक चांगल्या-वाईट अनुभवांचे धडे घेत या रणरागिणीने अनेक दाम्पत्यांना सुखी संसारात पुन्हा गुंफले. अनेक निरपराध मुलांना त्यांचे आई-वडील मिळवून देण्याचे काम त्यांनी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून केले. 

घरगुती हिंसाचारासह अनेक घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली असताना कै. शिवाजीराव पाटील बहुद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी सैनिक टाकळी व महिला व बालविकास विभागाच्या समुपदेशकांच्या कार्यामुळे असे गुन्हे दाखल होण्याआधीच त्यांच्यातील हेवेदावे संपविण्याचा प्रयत्न केला जातो.

सोशल मीडियाच्या वापराने अनेक दाम्पत्यांत वादाचे प्रसंग उद्‌भवतात. किरकोळ कारणांचा वाद डोक्‍यात घेऊन कुरबुरी करण्यापेक्षा संवादातून कुरबुरी संपवल्या पाहिजेत. वाद किरकोळ असतात; मात्र त्यावर त्यावर संवादातूनच मार्ग निघू शकतो. 
- प्रियांका देवर्षी,
समुपदेशक, कुरुंदवाड

पोलिस ठाण्यात समुपदेशन होईलच हे खात्रीशीर सांगता येत नाही. काहींना तर असे प्रकार कटकट वाटतात. योग्य प्रकारे समुपदेशन न केल्याने भांडणे मिटण्यापेक्षा ती टोकाला जाण्याचेच प्रसंग उद्‌भवतात; मात्र शिरोळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कुरुंदवाड येथील समुपदेशक सौ. देवर्षी यांनी दाम्पत्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांची नेमकी समस्या जाणून त्यावर योग्य समुपदेशन केल्याने आज ४१६ प्रकरणे त्यांनी समझोत्याने मिटवली. 

केंद्रांतर्गत प्रकरणे

  • एकूण नोंद प्रकरणे     ६६४

  • मिटलेली प्रकरणे     ४१६

  • एकवेळचे समुपदेशन     ३९

  • कायदेशीर प्रकरणे     १६६

  • केंद्रांतर्गत सुरू     ४३

बीएस्सी, एमएसडब्ल्यू झालेल्या सौ. देवर्षी पाच वर्षांपासून कुरुंदवाड ठाण्यातील समुपदेशन केंद्रातून हे कार्य कर्तव्य म्हणून अविरतपणे बजावत आहेत. मनातील मळवाटा दूर करत त्यांच्या संसाराची गाडी समुपदेशनातून पुन्हा रुळावर आणताना आनंद वाटतो, असे त्या सांगतात. याकामी  शिवाजीराव पाटील बहुद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळत असल्याचे सौ. देवर्षी यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News world Womens day speical story