पावसात सजला त्र्यंबोली यात्रेचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

‘फेसबुक’वर व्हिडिओ 
शुक्रवारी (ता. २१) त्र्यंबोली यात्रेचा अखेरचा दिवस असून जल्लोषात सोहळे साजरे होणार आहेत. काही तालीम संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ‘फेसबुक’वर गेल्या वर्षीच्या सोहळ्यांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. ‘परत तोच जल्लोष तोच दरारा- बगायची 
फक्त त्र्यंबोली यात्रा’. ‘गुलाल आपलाच विषय संपला’ अशा मथळ्याखाली हे व्हिडिओ अपलोड झाले आहेत.

कोल्हापूर - भर पावसात आणि तितक्‍याच सळसळत्या उत्साहात आज त्र्यंबोली यात्रेचा सोहळा सजला. यात्रेचे शेवटचे दोनच दिवस असल्याने सकाळपासूनच त्र्यंबोलीला पाणी वाहण्यासाठी विविध तालीम संस्था आणि गल्ल्यागल्यांत धांदल उडाली. दुपारपर्यंत काही मंडळांनी तर सायंकाळी पाचनंतर काही मंडळांनी सवाद्य मिरवणुकीने देवीला पाणी वाहिले. दरम्यान, ‘टेंबलाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आणि ‘पीऽऽऽ ढबाक’च्या तालात सारा टेंबलाई टेकडी परिसर दणाणून गेला.  

यंदाच्या यात्रांसाठी दोन मंगळवार आणि तीन शुक्रवार मिळाले होते. त्यांपैकी दोन मंगळवार आणि दोन शुक्रवारी हा सोहळा संपन्न झाला असून शुक्रवारी (ता. २१) यात्रेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उर्वरित सर्वच तालीम संस्था जल्लोषात हा सोहळा साजरा करणार आहेत. आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र काल रात्रीपासूनच सर्वत्र यात्रेच्या तयारीला प्रारंभ झाला होता. त्यामुळे पावसाची तमा न बाळगता सकाळपासूनच त्र्यंबोली देवीला पाणी वाहण्यासाठी सवाद्य मिरवणुका सुरू झाल्या. गुलालाच्या उधळणीने सारा परिसर न्हाऊन निघाला. दरम्यान, शहरात परडी जत्रा आणि ग्रामीण भागातील म्हाईची धांदलही आता उडाली आहे. मंगळवारी आणि शुक्रवारी ग्रामीण भागात म्हाईचा सोहळा साजरा होतो. ग्रामदैवत आणि सर्व देवतांना नैवेद्य वाहण्याची ही परंपरा बदलत्या काळातही कायम आहे. 

सजल्या बैलगाड्या
नारळीच्या झावळ्यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून देवीला पाणी वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. आज काही तालमींनी तर परिसरातील सर्व बैलगाड्या एकत्र केल्या. त्या सजवल्या आणि त्यातून देवीला पाणी वाहिले. एकापाठोपाठ एक बैलगाड्या आणि पुढे मोटारसायकलींचा ताफा अशा वातावरणामुळे सोहळ्याला आणखीन उंची लाभली.

Web Title: kolhapur news yatra rain