तरुणाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

कोल्हापूर - तरुणाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जीवे मारण्याची धमकी देत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडील ७८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

कोल्हापूर - तरुणाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जीवे मारण्याची धमकी देत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडील ७८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

संबंधित तरुणाने गुरुवारी (ता. ३) जुना राजवाडा पोलिसांत घडला प्रकार सांगितला. विजय निवृत्ती कांबळे (वय ३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले. विशाल शिंदे (वय ३२), कांबळे, राजा, 
गणी भाई (पूर्ण नाव पत्ता नाही) आणि अनोळखी चौघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विजय निवृत्ती कांबळे हे वित्त संस्थेतून कर्ज मंजूर करून देण्याचे काम करतात. त्यांना ३० एप्रिलला विशाल शिंदे नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर फोन करून कळंबा साई मंदिर येथे बोलावून घेतले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते तेथे गेले. तेथे एक ग्रे रंगाची मोटार उभी होती. त्यात विशाल व त्याच्या साथीदारांनी फसवून गाडीत बसवले.

त्यानंतर त्यांना आयटीआय, पाचगाव रोड, आर. के. नगर, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाईव्ह स्टार एमआयडीसीमार्गे फिरवले. प्रवासात विशालसह आठ जणांनी त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी आणि स्टीलच्या पाईपने मारहाण केली.

त्या सर्वांनी ‘तू कर्ज प्रकरणात भरपूर पैसे मिळवले आहेस. आत्ताच्या आत्ता आम्हाला २५ लाख रुपये दे, नाही तर तुला ठार मारतो. तुला मारण्याची सुपारी मिळाली आहे,’ अशी धमकी दिली. त्यानंतर विजय कांबळे यांच्या पाकिटातील साडेचार हजारांची रोकड आणि एटीएममधील चार हजार काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. 

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी कांबळे यांनी मित्र बाबासाहेब कांबळे यांना फोन केला. ‘मी साहेबांबरोबर’ असल्याचे सांगत मला ७० हजारांची तातडीने गरज असल्याचे सांगितले; पण बाबासाहेब यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी स्वतःच्या निगवे खालसा येथील घरात जा. पैसे असतील तर बघ. नाहीतर दागिने विकून पैसे घेऊन ये, असा निरोप दिला.

त्यानुसार बाबासाहेबांनी त्यांच्या घरातील दागिने विकून आणि स्वतःजवळील रक्कम असे ७० हजार रुपये त्यांना सायबर चौक परिसरात दिले. त्यानंतर ते निघून गेले. हे पैसे अपहरणकर्त्यांनी जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना अज्ञातस्थळी सोडून दिले. घाबरलेले विजय कांबळे यांनी काल जुना राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित आठ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे गुजर यांनी सांगितले. 

कागदपत्रे देण्याचा बहाणा
वित्त संस्थेतून कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे काम विजय कांबळे करतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड असते. याची माहिती घेऊन कर्ज प्रकरणाची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने त्यांना कळंबा परिसरात अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. 

Web Title: Kolhapur News Youth kidnap case