युवराज पाटील यांना पुन्हा दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कोल्हापूर - भूविकास बॅंकेचे थकबाकीदार असल्याचे सिद्ध झाल्याने शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे अपील फेटाळून लावत त्यांना अपात्र ठरवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय आज विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांनी कायम ठेवला. 

कोल्हापूर - भूविकास बॅंकेचे थकबाकीदार असल्याचे सिद्ध झाल्याने शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे अपील फेटाळून लावत त्यांना अपात्र ठरवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय आज विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांनी कायम ठेवला. 

भूविकास बॅंकेचे थकबाकीदार असल्याने श्री. पाटील यांना अपात्र ठरवावे अशी तक्रार संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी श्री. काकडे यांच्याकडे केली होती. श्री. पाटील यांनी पाइपलाइन व मोटर खरेदीसाठी भूविकास बॅंकेच्या कागल शाखेतून १५ लाख ८३ हजारांचे कर्ज घेतले होते. सध्या हे कर्ज थकीत असून थकबाकीची रक्कम २२ लाख रुपयांवर पोचली आहे. श्री. पाटील यांच्याशिवाय एम. एम. पाटील व मानसिंग पाटील हेही भूविकास बॅंकेचे थकबाकीदार असल्याने त्यांनाही अपात्र ठरवण्याची तक्रार श्री. देसाई यांनी केली होती; पण या दोघांनी याचा निकाल लागण्यापूर्वीच संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. 

युवराज पाटील यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर सुनावणी घेऊन श्री. काकडे यांनी श्री. पाटील यांना अपात्र ठरवले. श्री. काकडे यांच्या या निर्णयाविरोधात श्री. पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते.

या अपिलावर १३ जुलै रोजी सुनावणी झाली. श्री. देसाई यांच्या वतीने ॲड. अशोकराव साळुंखे तर श्री. पाटील यांच्या वतीने ॲड. लुईस शहा व ॲड. दत्ता राणे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन श्री. डोईफोडे यांनी आज श्री. पाटील यांचे अपील फेटाळून लावताना श्री. काकडे यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. 

दुसऱ्या अपिलावर २६ ला सुनावणी
थकबाकीच्या कारणावरून अपात्र ठरवलेल्या एम. एम. पाटील व मानसिंग पाटील यांच्यापैकी एम. एम. पाटील यांनी विभागीय सहनिबंधकाकडे केलेल्या अपिलावर २६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मानसिंग पाटील यांनी या निर्णयाविरोधात दाद मागितलेली नाही.

Web Title: kolhapur news yuvraj patil