जन्मभूमीच्या नात्याला ६४ वर्षांनी फुटली पालवी

झेडजीस्ला व त्‍यांचे बंधू टेडसुझ यांचे ६४ वर्षांपूर्वीचे कोल्हापुरातील छायाचित्र. ६४ वर्षांनंतरचे दुसरे छायाचित्र.
झेडजीस्ला व त्‍यांचे बंधू टेडसुझ यांचे ६४ वर्षांपूर्वीचे कोल्हापुरातील छायाचित्र. ६४ वर्षांनंतरचे दुसरे छायाचित्र.

कोल्हापूर - तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ. या महायुद्धात निर्वासित झालेल्या पोलंड देशवासीयांचा तळ त्यावेळी शहराजवळच्या वळिवडे गावात होता. तेथे १९४४ साली त्या निर्वासित छावणीत त्याचा जन्म झाला. त्यानंतर तीन वर्षे तो याच छावणीत वाढला. युद्ध ओसरल्यावर त्याचे कुटुंबीय परत पोलंडला गेले. अर्थात त्याचेही तीन वर्षांचे कोल्हापूरशी असलेले नाते संपले. आज ६४ वर्षांनी मात्र त्या नात्याला पुन्हा पालवी फुटली. ज्या कोल्हापुरात त्याचा जन्म झाला, तिथल्या पाणी व मातीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो आज तब्बल ६४ वर्षांनी पोलंडहून कोल्हापुरात सहकुटुंब आला आणि आपलं जन्मगाव पाहून जाम खूश झाला. झेडजीस्ला या पोलंड देशवासीयाची कोल्हापूरच्या असलेल्या ऋणानुबंधाची ही आगळीवेगळी कहाणी आहे. १९४४ साल म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ. या युद्धाची झळ अनेकांना बसलेली. पोलंड देशवासीयही देश सोडून भारताच्या आश्रयाला आलेले. त्यांच्या निवाऱ्याची सोय त्यावेळी वळिवडेजवळ खास छावणी बांधून केली.

त्यांच्यासाठी कौलारू चाळ, पोस्ट, तार ऑफिस, चॉकलेट, केक, शीतपेये व इतर वस्तूंसाठी दुकान, खेळासाठी मैदान, छोटा दवाखाना, प्रार्थनास्थळ, खुले सिनेमागृह अशी तेथे सोय होती. छावणीला पूर्ण बंदोबस्त दिला होता. या छावणीत महिला, मुले, ज्येष्ठ पोलंडवासीय जास्त होते. तेथेच झेडजीस्ला याचा जन्म झाला. तीन वर्षे तो या छावणीतच त्याच्या आई व मोठ्या भावासमवेत वाढला. त्यावेळच्या पंचगंगेचे गोडसर स्वच्छ पाणी, छावणीच्या परिसरातील शेतवडीमुळे थंडगार हवा, अशा आरोग्यदायी वातावरणात तो तीन वर्षे येथे वाढला.

युद्धाची तीव्रता ओसरल्यानंतर निर्वासितांची छावणी येथून टप्प्याटप्प्याने हलवली. झेडजीस्ला, त्याची पत्नी ख्रिस पिटूरा, त्याचा बंधू त्याच्या कुटुंबीयासह पोलंडला परतला. तेथे शिकून मोठा झाला. व्यवसायात यशस्वी झाला; पण राहून राहून तो कोल्हापूर ही माझी जन्मभूमी. मी तेथे एकदा जाऊन येणारच म्हणत होता; पण सातासमुद्रापार असलेल्या पोलंडहून कोल्हापूरला तसे झटकीपट येणे शक्‍य नव्हते. त्यात तब्बल ६४ वर्षे गेली. झेडजीस्लाने ठरवले की काहीही करून कोल्हापूरला जायचेच. तो, त्‍यांचे बंधू टेडसुझ, पत्नी, भाऊ, मुले यांना घेऊन काल पोलंडवरून मुंबईत आणि आज मुंबईहून कोल्हापूरला पोचला. कोल्हापूर पाहून जाम खूश झाला. दोन मिनिटे डोळे बंद करून उभारला आणि जन्मगाव पाहून आयुष्याचं सार्थक झालं, एवढीच साधी-सोपी प्रतिक्रिया व्यक्त करून बाकी कोल्हापूर पहायला बाहेर पडला. कर्नल विजयसिंह गायकवाड व प्रियवंदा गायकवाड यांनी त्यांच्या या कोल्हापूर भेटीचे नियोजन केले. गुरुवारी (ता. ५) ते वळीवडे गावी जाणार आहेत.

कोल्हापूरविषयी कृतज्ञतेची भावना
बुधवारी (ता. ४) रात्री कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी कर्नल गायकवाड यांच्या निवासस्थानी कोल्हापुरी पाहुणचार घेतला. त्यावेळी जुनी छायाचित्रे व जुन्या आठवणी यांची त्यांनी देवाण-घेवाण केली व महायुद्धासारख्या संकटाच्या काळात कोल्हापूरसारख्या एका गावात पोलंडवासीयांना जो आसरा मिळाला, त्याबद्दल संपूर्ण देशात कोल्हापूरविषयी कृतज्ञतेची भावना असल्याचे झेडजीस्ला कुटुंबीयांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com