कोल्हापूरातील ग्रामपंचायतींमध्येही राबविणार झिरो पेंडन्सी

विकास कांबळे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  महसूल विभाग, जिल्हा परिषद, महापालिका नगरपालिका यांच्यानंतर आता ग्रामपंचायतींमध्येही झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १ नोव्हेंबरपासून त्याची सुरवात होईल. ​

कोल्हापूर -  महसूल विभाग, जिल्हा परिषद, महापालिका नगरपालिका यांच्यानंतर आता ग्रामपंचायतींमध्येही झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १ नोव्हेंबरपासून त्याची सुरवात होईल. दरम्यान, अभिलेख वर्गीकरणाच्या (झिरो पेंडन्सी) आज अखेरच्या दिवसापर्यंत दिवसापर्यंत जिल्हा परिषदेतील ४ लाख ३८ हजार ६७८ फाईलचे (नस्ती) वर्गीकरण करण्यात आले. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगले काम करणाऱ्या जिल्हा परिषदांचे कौतुक केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नाव आहे.

शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या झिरो पेंडन्सीच्या पहिल्या टप्प्याची मुदत आज संपली. जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभाग वगळता सर्व विभागांनी आपले काम पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीमधीलही काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात ४ लाख ३८ हजार ६७८ फाईलचे वर्गीकरण करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील २ लाख ३२ हजार २४४ तर पंचायत समितीमधील २ लाख ६ हजार ४३४ फायलींचा समावेश आहे.

वर्गीकरण केलेल्या फायलींतील कायमस्वरूपी जतन करावयाच्या फायलींमध्ये ७१ हजार ८४४ व ३० वर्षापर्यंत जतन करावयाच्या फायलींची संख्या २ लाख ४८ हजार १६१ आहे. याशिवाय १० वर्षापर्यंत जतन करावयाच्या फायलींची संख्या १ लाख १६ हजार ८०५ तर पाच वर्षापर्यंत जतन करावयाच्या फायलींची संख्या १ हजार ८६८ इतकी आहे. आज अखेरचा दिवस असल्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागांमध्ये गठ्ठे बांधण्याची घाई सुरू होती. या अभियानामुळे वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या फायली बाहेर निघून त्यावर निर्णय झाले.

यासंदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचा आढावा घेतला. चांगले काम केलेल्या राज्यातील जिल्हा परिषदांचे कौतुक करणारे पत्र त्यांनी जिल्हा परिषदांना पाठविले आहे. यात कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. ठाणे, रत्नागिरी, नाशिक, लातूर, जालना, अमरावती, गोंदिया आदी जिल्हा परिषदांमध्ये मात्र या अभियानात समाधानकारक काम झाले नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. ज्यांची कामे समाधानकारक झालेली नाहीत, त्या सर्व जिल्हा परिषदांमधील कामाचा अहवाल तत्काळ पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ग्रामपंचायतीत आजपासून अंमलबजावणी
महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये झिरो पेंडन्सी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर या उपक्रमाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगले काम केले. दुसऱ्या टप्प्यातही आपण सर्वांनी झोकून देऊन काम केल्यास स्वच्छ कार्यालय, तत्पर सेवा (झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल) देणारा विभाग म्हणून ग्रामविकास विभाग पहिला विभाग ठरेल, असे मंत्री मुंडे यांनी जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतीबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य विभाग, अंगणवाडी केंद्र येथेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रम राबवताना अभियान सुरू करण्यापूर्वीची व अभियान राबविल्यानंतरची छायाचित्रे काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला मात्र बक्षिसे ठेवली आहेत. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायती झिरो पेंडन्सीमध्ये चांगले व उल्लेखनीय काम करतील त्यांचा राज्यपातळीवर सत्कार करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये उद्या (ता. १) पासून ग्रामपंचायत स्तरावर झिरो पेंडन्सी अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांची कार्यशाळा उद्या (बुधवारी) जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात आयोजित केली आहे. या कार्यशाळेस अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव मार्गदर्शना करणार आहेत. त्यानंतर ग्रामसेवकांचे प्रशिक्षण ज्या त्या तालुक्‍याच्या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला आहे.

११ नोव्हेंबरपासून अभिलेख्यांचे वर्गीकरण व अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. दहा दिवसांत हे काम पूर्ण करून त्याबाबतची माहिती २० नोव्हेंबरला प्रपत्र १ अ व १ ब मध्ये भरावयाची आहे. २१ नोव्हेंबरपासून शून्य प्रलंबिततेबाबत कामकाज सुरू करावयाचे आहे.

येथेही अभियान...
दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतींबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य विभाग, अंगणवाडी केंद्र येथेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रम राबवताना अभियान सुरू करण्यापूर्वीची व अभियान राबविल्यानंतरची छायाचित्रे काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

प्रेझेंटेशनचा मान कोल्हापूरला
झिरो पेंडन्सी अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मराठवाडा विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्यशाळा उद्या (ता. १) औरंगाबादला आयोजित केली आहे. या कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्याला प्रेझेंटेशन करण्याचा मान मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार या कार्यशाळेत प्रेझेंटेशन करणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी झिरो पेंडन्सीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळेच मंत्र्यांसमोर प्रेझेंटेशनचा मान मिळाल्याचे डॉ. खेमणार यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Zero pendency in Grampanchayat