`झीप`' फसवणूक प्रकरणातील सूत्रधाराच्या पुण्यातील घर, फार्म हाउसवर छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कोल्हापूर - ‘झीप कॉइन क्रिप्टो करन्सी’च्या माध्यमातून कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार संशयित बालाजी गणगेच्या पुण्यातील घरासह फार्म हाउसवर पोलिसांनी छापे टाकले; मात्र तो मिळून आला नाही. कंपनीने दोन कोटींची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

कोल्हापूर - ‘झीप कॉइन क्रिप्टो करन्सी’च्या माध्यमातून कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार संशयित बालाजी गणगेच्या पुण्यातील घरासह फार्म हाउसवर पोलिसांनी छापे टाकले; मात्र तो मिळून आला नाही. कंपनीने दोन कोटींची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीचे ओपनिंग मुंबईतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये कोट्यवधीची रक्कम खर्चून केल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. 

लक्ष्मीपुरीतील झीप कॉइन क्रिप्टो करन्सी कंपनी संशयित संजय कुंभार, अनिल नेर्लेकर, राजेंद्र नेर्लेकर आणि त्यांच्या साथीदारांनी दीड वर्षापूर्वी सुरू केली. आंतरराष्ट्रीय डिजिटल कंपनी असल्याचे सांगून त्यांनी ३० लाखांचा गंडा घातल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संजय, अनिल आणि राजेंद्रला अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. सूत्रधार गणगेच्या पुण्यातील घरावर आणि फार्म हाऊसवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला; मात्र तो त्यापूर्वीच कुटुंबासोबत पसार झाला.

कंपनीची सुरुवात उच्चभ्रू हॉटेलमध्ये
कंपनीची सुरुवात मुंबईतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचा चुराडा करून करण्यात आली होती. कंपनीचे मार्केटिंग नेर्लेकर, कुंभार व्यवस्थापन तर गणगे प्रत्यक्ष व्यवहार करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. कार्यालयातील संगणक जप्त करण्यात आला आहे; मात्र पासवर्डमुळे त्याचा डाटा अद्याप पोलिसांना उपलब्ध होऊ शकलेला नाही. कंपनीने सुमारे ५० कोटींच्या घरात गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. 

एजंटांना १५ टक्के लाभांश
कंपनीत अनेकांनी कोट्यवधीचे व्यवहार एजंटांमार्फत केले. त्या बदल्यात त्यांना १५ टक्के लाभांश देण्यात आला. व्यवहार रोखीने झाल्याने गुंतवणूकदारांकडे पुरावे नाहीत. ब्लॅकमनीचा वापर झाल्याने तक्रारीचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Zip coin Cripto currency fraud case