‘सकाळ’ - जिल्हा परिषदेचा शाळा दुरुस्तीचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा संकल्प आज जिल्हा परिषद आणि ‘सकाळ’ने व्यक्त केला. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार व शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये संवाद साधला.

कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा संकल्प आज जिल्हा परिषद आणि ‘सकाळ’ने व्यक्त केला. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार व शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये संवाद साधला.

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘शाळा’ या वृत्तमालिकेनंतर जिल्हा परिषदेने १२२६ पैकी ४५९ खोल्या तातडीने दुरुस्तीचे नियोजन केले आहे. उर्वरित ७६७ शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी ज्या-त्या गावातील ग्रामस्थ, प्राथमिक शाळांचे माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा दौरा सुरू करून नादुरुस्त शाळांची माहिती घेण्याचे काम केले जाईल, असे घाटगे यांनी सांगितले. 

‘सकाळ’ने जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या वर्गखोल्यांचे वास्तव मांडणारी ‘शाळा’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने या शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. आज कोल्हापूर ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये ‘शाळा’ दुरुस्तीबाबत निर्णय झाला. 

‘सकाळ’ने नेहमीच सकारात्मक बाबींना पाठबळ दिले आहे. खोल्या दुरुस्तीसाठी समित्या नेमल्या जातील. तसेच नेमके किती काम करावे लागणार, याचा आराखडा तयार केला जाईल.
- डॉ. कुणाल खेमणार 

जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून तसेच ज्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ही यादी मागवून घेतली आहे. ज्या ठिकाणी धोकादायक वर्गखोल्या आहेत. त्याचे काम सुरू केले जाईल. 
- अंबरिश घाटगे, शिक्षण समिती सभापती, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले आणि सध्या मोठ्या हुद्द्यावर किंवा व्यवसायात काम करणारे अनेक लोक स्वयंस्फूर्तीने मदत करत आहेत.  

- सुभाष चौगुले, 
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

या वेळी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक श्रीरंग गायकवाड उपस्थित होते.  

शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती व बांधकाम करावे लागणार आहे. दरम्यान, शासन किंवा इतर माध्यमातून मिळालेल्या निधीतून शिल्लक राहणाऱ्या वर्गखोल्या ‘सकाळ’ आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या त्या गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्थांना आवाहन करून मिळविण्याचा प्रयत्न करू.’’ 

डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या ५७९ पैकी १२२६ खोल्या नादुरुस्त आहेत. या खोल्यांचे नूतनीकरण किंवा नवीन बांधकाम करण्यासाठी असाच प्रयत्न सुरू केला आहे. २०१८-१९ साठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित आराखड्यामध्ये १२२६ वर्गखोल्या दुरुस्त करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामध्ये २०० शाळांमधील ४५९ खोल्या धोकादायक स्थितीमधील आहेत. यामध्ये, २०३ खोल्यांचे नूतनीकरण होऊ शकते. तर २५६ खोल्यांचे नवीन बांधकाम करावे लागणार आहे. ६७ खोल्यांचे निर्लेखन पूर्ण असून ७५ खोल्या प्रस्तावित आहेत. जिल्हा नियोजनकडून गेल्यावर्षीचा आणि यावर्षीचा असा एकूण ४ कोटी २५ लाख रुपये निधी प्रस्तावित आहे. यापैकी ६ कोटी ३७ लाख रुपये निधी उपलब्ध आहे.

याशिवाय, जि. प. स्वनिधीमधून, खनिकर्ममधून व एम्फथी फौंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थेकडून निधी उपलब्ध होत आहे. पहिल्या टप्प्यात ३०० शाळांमधील ४५० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून ६ कोटी ३७ लाख, जि.प. स्वनिधीतून २० लाख व खणिकर्ममधून १ कोटी २९ लाखांचा निधी वापरून इमारतींचा दर्जा सुधारता येणार आहे. 

दरम्यान, या निधीतून ज्या वर्गखोल्या शिल्लक राहणार आहेत. त्यांची जबाबदारी घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. खेमणार यांनी केले. 
 

Web Title: Kolhapur News ZP School Repairs resolution