शाहू पुरस्काराच्या निमित्ताने ठिणगी 

विकास कांबळे
शनिवार, 24 जून 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीची सभा झाल्यापासून शांत असलेले जिल्हा परिषदेतील राजकारण आता तापू लागले आहे. राजर्षी शाहू पुरस्काराच्या निमित्ताने ठिणगी पडली असून, विरोधकांबरोबर सत्तारूढ आघाडीतील लोकही आता नाराजी व्यक्‍त करू लागले आहेत. एका ज्येष्ठ "अण्णा'च्या आग्रहामुळे वादग्रस्त कर्मचाऱ्याला पुरस्कार देऊन भाजपने जिल्हा परिषदेतील आपल्या कारभाराची दिशा स्पष्ट केली आहे. पुरस्काराची नावे निश्‍चित करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीला पक्षप्रतोदालाच डावलण्यात आल्याने अगोदरच नाराज असलेले विजय भोजे अधिकच नाराज झाले आहेत. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीची सभा झाल्यापासून शांत असलेले जिल्हा परिषदेतील राजकारण आता तापू लागले आहे. राजर्षी शाहू पुरस्काराच्या निमित्ताने ठिणगी पडली असून, विरोधकांबरोबर सत्तारूढ आघाडीतील लोकही आता नाराजी व्यक्‍त करू लागले आहेत. एका ज्येष्ठ "अण्णा'च्या आग्रहामुळे वादग्रस्त कर्मचाऱ्याला पुरस्कार देऊन भाजपने जिल्हा परिषदेतील आपल्या कारभाराची दिशा स्पष्ट केली आहे. पुरस्काराची नावे निश्‍चित करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीला पक्षप्रतोदालाच डावलण्यात आल्याने अगोदरच नाराज असलेले विजय भोजे अधिकच नाराज झाले आहेत. 

जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी निवडीची सभा झाली. पदाधिकारी निवडीनंतर सर्व काही शांत चालले होते. नवीन सदस्य जिल्हा परिषदेत येत आहेत, कामाची माहिती घेत आहेत; पण सभागृहात सदस्य जाण्यापूर्वीच यावर्षीचा शाहू पुरस्कार सदस्यांना जाहीर झाला. पुरस्कार जाहीर करताना सर्वांना समान न्याय देणे अपेक्षित आहे. असे असतानाच शाहू पुरस्कारासाठी नावे निश्‍चित करताना भाजपने आपल्या भातावर तूप ओढून घेतल्याचे दिसते. सदस्यांमधून पाचजणांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यामध्ये भाजपचे दोन सदस्य आहेत. विरोधकांना मात्र डावलण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या एकाही सदस्याची निवड शाहू पुरस्कारासाठी केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये खदखद आहे. याचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्‍यता आहे. 

भाजपचे गटनेते व पक्षप्रतोद यांच्यातील वाद अजूनही मिटला नसल्याचे पुरस्कार निवडीसाठी बोलाविलेल्या बैठकीवरून दिसून आले. जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांच्या पहिल्याच बैठकीत पक्षप्रतोद म्हणून विजय भोजे यांची निवड जाहीर झाली. मात्र, भाजपच्या नेत्यांनी त्यांचा हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. ज्येष्ठ नेते अरुण इंगवले यांनी अध्यक्षपद मिळेल या आशेने राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, अध्यक्ष निवडीत त्यांच्या आशेवर पाणी फिरले. पक्षप्रतोदची तर अगोदरच निवड झाली होती. त्यामुळे श्री. इंगवले यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्यांसाठी एका रात्रीत गटनेता पद तयार करण्यात आले आणि पक्षप्रतोदांची खुर्ची आणि टेबल त्यांना देण्यात आले. त्यामुळे भोजे नाराज झाले. कार्यालय प्रवेशावेळी भोजे जिल्हा परिषदेत होते; पण केबिनकडे फिरकलेच नाहीत. तेव्हापासून ते नाराज आहेत. शाहू पुरस्कारासाठी नावांची निवड करण्याकरिता बोलाविलेल्या बैठकीस त्यांना कोणीच बोलाविले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले आहेत. 

शाहू पुरस्कारासाठी निवड होणारी व्यक्‍ती किमान वादग्रस्त नसावी, हे प्रशासन प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पाहणे आवश्‍यक होते. परंतु, एका ज्येष्ठ अण्णाच्या आग्रहामुळे वादग्रस्त कर्मचाऱ्याची पुरस्कारासाठी निवड करून येत्या पाच वर्षांत चालणाऱ्या कारभाराची झलक "अण्णां'नी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोरच दाखवून दिली आहे. 

यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. एखादे चांगले काम करावयाचे असेल तर सर्वांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक असते. शाहू पुरस्कारासाठी नावे निश्‍चित करताना आम्हाला त्याची कल्पनाच दिली नव्हती. हे चूक आहे. याबाबत आपण सभागृहात बोलू. 
- युवराज पाटील (सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस) 

गटनेता जोरात पक्षप्रतोद कोमात 
जिल्हा परिषदेत पक्षप्रतोद पद मोठे की गटनेता मोठे? याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एखाद्या महत्त्वाच्या बैठकीसाठी पक्षप्रतोदला बोलवायचे की गटनेत्याला बोलवायचे? असा प्रश्‍न प्रशासनाला पडत आहे. गटनेते अरुण इंगवले महत्त्वाच्या बैठकीला बहुतांशीवेळा उपस्थित असतात. मात्र, पक्षप्रतोद भोजे यांना निमंत्रणच दिले जात नाही. त्यामुळे भाजपच्या सदस्यांमध्ये सध्या "गटनेता जोरात, पक्षप्रतोद कोमात' अशी चर्चा सुरू आहे. 

Web Title: kolhapur news zp Shahu Award