कोल्हापूर आकाशवाणी होणार आणखी सुरेल

कोल्हापूर आकाशवाणी  होणार आणखी सुरेल

कोल्हापूर - येथील आकाशवाणी केंद्राची प्रसारण क्षमता ६ वरून १० किलोवॉट केल्याने रेडिओचा सूर अधिक सुरेल झाला आहे. दोन-तीन दिवसांत या बदलाचे तांत्रिक काम पूर्ण झाले. आकाशवाणीचा प्रक्षेपण मनोरा पन्हाळा येथे काली बुरजाजवळ आहे. मुळातच उंचावर असलेला पन्हाळगड, त्यावर ३३० फूट उंचीचा मनोरा व येथे वाहणारा भन्नाट वारा अशा परिस्थितीत या मनोऱ्यावर चढून तांत्रिक काम पूर्ण झाले. 

प्रसारण क्षमता वाढल्याने रेडिओचा सूर तर सुरेल झालाच आहे. पण, साधारण कोल्हापूरपासून १२० किलोमीटर परिघापर्यंत आता कोल्हापूर आकाशवाणीचे सूर कानावर पडणार आहेत. केवळ आकाशवाणीच नव्हे, तर इतर खासगी एफएम रेडिओलाही या नव्या बदलाचा फायदा होणार आहे. कारण आकाशवाणीच्या मनोऱ्यावरच खासगी एफएम रेडिओच्या डिश आहेत. येथील आकाशवाणी केंद्र २६ वर्षांपूर्वी सुरू झाले. तत्पूर्वी, सांगली आकाशवाणी केंद्र मनोरंजनाचा आधार होते. सकाळची भावगीते, भक्तिगीते, संस्कृत बातम्या, सायंकाळी सातच्या बातम्या, मुलाखती, रात्री आपली आवड अशा कार्यक्रमांमुळे रेडिओचे नाते घराघरांत घट्ट झाले होते. दूरचित्रवाणी संच नसल्याने रेडिओचे स्थान प्रत्येक घरातील दिवाणखान्यात रुबाबात होते. 

कोल्हापूर आकाशवाणी सुरू झाल्यानंतर रेडिओ आणखी जवळचा झाला. कोल्हापूर आकाशवाणी सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी सुरू होत राहिली. मध्यंतरीच्या काळातील थोडा ब्रेक वगळता रात्री ११ वाजून १० मिनिटांपर्यंत सुरू राहिली.

आकाशवाणीच्या जोडीला खासगी एफएम रेडिओ येथे सुरू झाले. त्यामुळे रेडिओचे प्रक्षेपण आणखी विस्तारले. रेडिओवरील निवेदकांच्या दमदार आवाजाबरोबरच रेडिओ जॉकींचा चटपटीत आवाजही कानाला सवयीचा झाला. एफएम रेडिओ घराघरांत नव्हे, तर वाहनातही बसविला गेला. कानाला हेडफोन लावून रेडिओ ऐकणाराही एक श्रोता वर्ग तयार झाला. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर आकाशवाणीची प्रसारण क्षमता सहा किलोवॉटच होती. नव्या बदलानुसार आता ती दहा किलोवॉट करण्यात आली. 

१२० किलोमीटरपर्यंत प्रक्षेपण
कोल्हापूर आकाशवाणी केंद्र पन्हाळगडावर आहे. तेथे ३३० फूट उंचीचा मनोरा आहे. हा मनोरा कोल्हापुरातूनही दिसू शकतो. या मनोऱ्यावरील काम अलिगडच्या जयदुर्गे फर्मच्या तंत्रज्ञांनी केले. मनोऱ्यावर चढून काम करणे हे खूप जोखमीचे असते. या कामासाठी गेले सात-आठ दिवस सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर आकाशवाणी व इतर सर्व खासगी एफएम रेडिओचे कार्यक्रम बंद होते. ते आता पूर्ववत सुरू झाले आहेत. कोल्हापुरातून बाहेर जात असलेल्यांना हे सूर १२० किलोमीटरपर्यंत ऐकता येणार आहेत. 

या टीमने केले काम पूर्ण
कोल्हापूर आकाशवाणी केंद्र व कार्यक्रम प्रमुख तनुजा कानडे, तांत्रिक प्रमुख सतीश पडळकर, त्यांचा तांत्रिक कर्मचारी वर्ग अशोक जंगम, एस. आर. टकटे, बी. एम. हडपद, मुंबईहून आलेले श्री. तळेकर, श्री. सुर्वे यांनी हे काम पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com