गटारे तुंबली; पाणी रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

कोल्हापूर - शहर रस्ते विकास प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या ४९.४९ किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आयआरबीने स्ट्रॉम वॉटर ड्रेनेच्या गोंडस नावाने चुकीच्या पद्धतीने गटारी बांधल्याचा फटका पावसाळ्यात बसत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या गटारीतून वाहून नाल्यात जाण्याऐवजी हे पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे. गटारी तुंबल्या असल्याने आणि महापालिका कर्मचाऱ्यांना त्या साफ करता येत नसल्याने हे पाणी साचून राहिले. परिणामी, हे रस्ते लवकर खराब होण्याची शक्‍यता आहे.

शहर रस्ते विकास प्रकल्पांतर्गत २००८ पासून शहरात रस्ते विकासाचे काम झाले. शहरातील १३ प्रमुख रस्त्यांचा यात समावेश होता. शाहू जकात नाका, रेल्वेफाटक उड्डाणपूल ते एसपीपी ऑफिस, शिये टोल नाका, कसबा बावडा ते चिमासाहेब चौक, दसरा चौक टायटन ते हॉकी स्टेडियम, सायबर चौक, आयसोलेशन ते संभाजीनगर, कळंबा साई मंदिर ते संभाजीनगर, शिवाजी पूल ते तावडे हॉटेल, रंकाळा व्हीआर चौक ते पुईखडी, संभाजीनगर ते व्हीआर चौक, रेल्वेफाटक उड्डाणपूल ते उमा चित्रपटगृह अशा ४९.४९ किलोमीटर रस्त्यांचा समावेश होता. 

या गटारींचे डिझाईनच चुकीचे झाल्याने त्याचे परिणाम आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत. हाफ राउंड गटार असत्या, तर मोठ्या गतीने पाण्याचा निचरा झाला असता. पाणी रस्त्यावर साचले नसते. त्यामुळे दीर्घकाळ रस्तेही खराब झाले नसते. याबाबत अनेकदा शहरातील तज्ज्ञांनी अहवाल दिले. पण, आयआरबी कंपनीने याला केराची टोपली दाखविली. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आता रस्त्यावरून पाणी साचत आहे.

लक्ष्मीपुरी तुंबली
लक्ष्मीपुरीत पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत होते. लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, फळ मार्केट, धान्य मार्केट येथील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी होते. लक्ष्मीपुरी पावसाळाभर गलिच्छ अवस्थेतच आहे.

गटारी साफ करायच्या कशा?
या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आयआरबीने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी स्ट्रॉम वॉटर ड्रेन असे गोंडस नाव देऊन गटारी बांधल्या. चौकोनी बॉक्‍स आकाराच्या या गटारी बंदिस्त आहेत. त्यावर फुटपाथ केले आहेत. दर पन्नास मीटरवर चेंबर केले आहेत. पण, महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना या गटारीच साफ करता येत नाहीत. तसेच अनेक ठिकाणी या गटारी खंडित झाल्या आहेत. त्या पुढे नाल्याला जोडलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या साऱ्याचा फटका बसत आहे. गटारी साफ करायच्या कशा? असा प्रश्‍न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.

Web Title: kolhapur rain water on the road