सकाळ वर्धापन दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनास उदंड प्रतिसाद

सकाळ वर्धापन दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनास उदंड प्रतिसाद

कोल्हापर - झाडाआड डोकावणारा पट्टेरी वाघ, खडकाच्या खोबणीतून टवकारलेला बिबट्या, हवेत झेपावलेला काळवीट, विलोभनीय सौंदर्याचा व चाणाक्ष डोळ्यांचा स्वर्गीय नर्तक पक्षी, अशा निसर्ग समृद्धतेचे प्रतीक असलेल्या वन्यजीवांच्या लोभस छटा ... आणि पंढरीच्या वाटेवरील भक्तिरंगात दंग झालेले वारकरी, त्यातील प्रत्येक चेहऱ्यांवर दाटलेली विठुरायाच्या दर्शनाची आस, दिंडीतील शेकडो भक्तांनी टाळमृदंगाच्या गजरात धरलेला नृत्याचा ताल, अशा भक्ती रंगातील भावछटा दर्शविणारे छायाचित्रकार रमण कुलकर्णी यांचे ‘जैवविविधता’, तर सकाळचे आर्टिस्ट प्रकाश पाटील यांचे ‘रंग वारीचे’ यांच्या छायाचित्र प्रदर्शनास येथे सुरुवात झाली.

दै. ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने हे प्रदर्शन भरले आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व महापौर माधवी गवंडी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक तंत्रज्ञान भाऊसाहेब पाटील, समूह संपादक संचालक श्रीराम पवार, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, निवासी संपादक निखिल पंडितराव, छायाचित्रकार प्रकाश पाटील, रमण कुलकर्णी, उद्योजक ललित गांधी आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला. बाबूराव पेंढारकर कला दालन गर्दीने फुलून गेले. निसर्ग सौंदर्यात भर घालणारी जैवविविधता आणि भक्तीतील पवित्रता व एकतेचा भाव दर्शविणाऱ्या वारीतील भाव छटा पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतात.  

जैव विविधतेच्या छायाचित्रांपैकी, मड स्कीपर हे माशाचे छायाचित्र आहे, हा मासा पाण्यात नव्हे, तर ओल्या जमिनीवर वावरतो, माळटिटवी पाणतळाच्या जागी वावरते. तिची पिवळी चोच, पिवळे पाय, तिच्या अंग सौंदर्याचे गुण दर्शवतात. उंच झाडावर चढलेला काळा बिबट्या (ब्लॅक पॅन्थर) पाहून त्याच्या अचाट कौशल्याचा सहज अंदाज येतो. दाजीपूरचे अभयारण्य ज्याच्या नावाने आहे. असा गवा पश्‍चिम घाटात सर्रास आढळतो. बलदंड अशा गव्याचे छायाचित्र लक्षवेधी आहे. 

याशिवाय सुरेल शिळ घालणारा मलबारी कस्तूर पक्षी, पश्‍चिम घाटातील गर्द झाडीतील नयनरम्य धबधबे, ओढ्याच्या परिसरात आढळणारा काळ्या रंगाचा पक्षी आहे, काटेरी मुकुट फुलवेली ऑर्किड या निसर्ग सौंदर्यात भर घालणारी फुले, त्याची गुंफन, रंगीत फुले, नैसर्गिक आकार अशी गुणवैशिष्ट्ये त्यांच्या छायाचित्रात आहेत. 

याशिवाय नेहमीच पश्‍चिम घाटात आढळणारे उन्हात पहुडलेली बिबट्यांची नर-मादी, काहीशी सावध चाल करून उभे ठाकलेली आहेत. रमण कुलकर्णी यांच्या प्रत्येक छायाचित्रणातील सूक्ष्मता विलोभनीय, तितकीच अभ्यासपूर्ण आहे.

आषाढी वारीचे वेध अख्या महाराष्ट्राला लागतात. टाळ मृदंग वाजती आनंदे प्रेम गर्जती, असा भाव घेऊन विठू माऊलींच्या दर्शनासाठी वारीला पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीतील भाव छटा प्रकाश यांनी अप्रतिमरीत्या कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. विठुरायाचे दर्शन हाच आपल्या जगण्याचा जणू आधार, माऊलीच्या दर्शनासाठी मैलोमैल चालताना विठ्ठल नामात वारकरी दंग होतात.

संवादीनीचे सूर तालांच्या सोबत एकेक पाऊल पुढे चालताना अंग घामाने नितळते, मन विठ्ठल भक्तीच्या जोषाने चैतन्यदायी होते, असे चैतन्य घेऊन विठू माऊलींची भक्तगण लिन होतात. त्यांच्या विविध छटा प्रकाश यांच्या प्रत्येक छायाचित्रातून प्रसन्नपणे व्यक्त होतात. ‘तुझे दर्शन झाले आता, विठ्ठल नामाची शाळा भरली, पंढरीचा वास चंद्रभागेत स्नान, चल ग सखे चल ग सखे पंढरीला, अशा पंढरीच्या वारीतील भाव छटा दर्शविणारी छायाचित्रे प्रकाश यांच्या उत्तम काम्पोझिशनची उदाहरणे ठरली आहेत.

बहुविध छटा
वारीच्या छायाचित्रातील माऊलीच्या प्रतिमेकडे पाहणारा न्हानगा वारकरी, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन केलेले रिंगण, विठ्ठल नामाची शाळा भरली, ही वारकऱ्यांची भक्ती दर्शविणारी वारीतील छायाचित्रे, तर रमण कुलकर्णी यांची काळवीट, शेखरू, चष्मेवाला बुबुल, झाडावरील बेडूक, जंगलातील बेभरवशी अस्वल, पट्टेरी वाघ अशा छायाचित्रांनी या प्रदर्शनाचे सौंदर्य वाढविले आहे.   

उद्यापर्यंत प्रदर्शन खुले 
जैव विविधता व रंग वारीचे हे छायाचित्र प्रदर्शन येत्या शनिवारी (ता. ३) पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना पहाता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com