विस्कटलेली घडी बसवण्याची धडपड

सुधाकर काशीद
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला.

कोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला. 

गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले.

आज पुराचे पाणी बऱ्यापैकी उतरले. पाण्यात फक्त कौले दिसणाऱ्या घरांचे दरवाजे दिसू लागले. भिंती भिंतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी थेट स्पष्ट रेषा दिसू लागली. रस्त्यावर चिखल. उग्र कुबट वास सर्वत्र पसरलेला. अशा वातावरणात एक एक घराचे कुलूप उघडले गेले. घराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आले. लहान मुलांनी ही अवस्था पाहू नये म्हणून अनेकांनी त्यांना नातेवाईकांच्या घरी ठेवले. मग ओले चिंब झालेले आपले घर सावरण्याचे काम ओले झालेल्या डोळ्यांनी सुरू केले. 

याही परिस्थितीत माणसाचा देवावर भरोसा. त्यामुळे काहींनी प्रथम देव्हाऱ्यातले देव, पाण्याने फुगलेले देवदेवतांचे फोटो बाहेर काढले. ते धुतले. मग घराची एक एक खोली धुण्यास सुरवात केली. पण हे धुवायलाही पाणी अपुरे. त्यामुळे घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलेल्या पुराच्या पाण्यातूनच बादल्या, घमेली भरुन पाणी आणावे लागले व घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक खोलीत खराटे फिरू लागले. हे करताना घरातली औषधे, शिवण मशिन, रेफ्रीजरेटर, कपाटातली पुस्तके, वह्या, बॅंक, गॅस सिलींडरची पासबुके, टीव्ही, रोज हातात असणारा रिमोट हे सारे काही निकामी झाले असल्याचे धान्यात आले. काडी काडी करुन संसार उभा करणाऱ्या भगिनींना हे पाहणे काही काळ कठीण झाले. अशा घरात अजून चार-पाच दिवस तरी गॅस शेगडी  पेटवता येणार नाही. अंथरुणावर पाठ टाकता येणार नाही. हे बहुतेक ध्यानात आले आणि आणखी दोन तीन दिवस तरी निवारा केंद्रात किंवा नातेवाईकांच्या घरात राहावे लागणार हे स्पष्ट झाले. 

शाहुपूरी, शुक्रवार पेठेत मुस्लिम कुटुंबाची अनेक घरे. आज बकरी ईद; पण नेहमीप्रमाणे घरात कसलीही धावपळ नाही. खास ईदचे वैशिष्ठ्य म्हणून ओळखली जाणारी खिर शिजली नाही. नमाज पठणाला ही गर्दी उपस्थित कमी राहिली. दुकानदारांनीही शटरची कुलपे जड अंतकरणानेच काढली. शटर वर करताच जे काही दिसले ते पाहून काहींना सुन्न व्हावे लागले. तर काही जणांना नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी दुकानातले साहित्य उपसावे लागले. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र नातेवाईक आले. या पुरात शहरातली महत्वाची दहा हॉस्पिटल. त्यापैकी काही पूर्ण तर काही बेसमेंटपर्यंत पाण्यात गेली. या दवाखान्यातले रुग्ण व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या बोटीतून चार पाच दिवसापूर्वी बाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पण आता बहुतेक दवाखान्यातले पाणी कमी झाले आणि डॉक्‍टर, परिचारिक, आया, वॉर्ड बॉय सारेजण तोंडाला मास्क व हॅंडग्लोव्हज्‌ घालून दवाखाना स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एरव्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारे हे दवाखाने आता भकास दिसत होते. 

सेंट्रल किचनसाठी प्रयत्न सुरू
पुराचे, घराभोवतालचे पाणी कमी झाले असले तरी या घरात तत्काळ स्वयंपाक करता येणार नाही. याचा अंदाज घेऊन हॉटेल मालक संघाने पुढचे चार दिवस आपले सेंट्रल किचन सुरू राहील, असा प्रयत्न चालू ठेवला आहे. कारण संपूर्ण कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या जेवणाचा भार हॉटेल मालक संघाने व विविध स्वयंसेवी संस्थांनी उचलला आहे. आता त्याचा भार आणखीनच वाढला आहे. त्यासाठी तेही जोमाने प्रयत्न करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Sanlgi Flood Loss Family Life