कागल-सातारा सहापदरी मार्गाला वादाचा अडथळा

डॅनियल काळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - कागल-सातारा या सहापदरी महामार्गाचे काम कोणी करायचे, या वादात अडकले आहे. नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात हा वाद सुरू आहे. सुमारे २५०० कोटी रुपयांच्या या कामामुळे निर्माण झालेला वाद मिटल्याशिवाय या कामाची फाईलच पुढे सरकणार नाही.

कोल्हापूर - कागल-सातारा या सहापदरी महामार्गाचे काम कोणी करायचे, या वादात अडकले आहे. नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात हा वाद सुरू आहे. सुमारे २५०० कोटी रुपयांच्या या कामामुळे निर्माण झालेला वाद मिटल्याशिवाय या कामाची फाईलच पुढे सरकणार नाही.

कामासाठी नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या दोन्ही यंत्रणा आपणच हे काम करणार यावर ठाम असल्याने तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, सातारा-कागल या सहापदरी कामात हा वादच मोठा अडथळा ठरला आहे.

पुणे-बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा राष्ट्रीय महामार्ग आहे. २००१ मध्ये या महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरवात झाली. दोन-तीन वर्षांतच हा महामार्ग चारपदरी झाला. चारपदरी महामार्गही अपुरा पडत आहे. त्यामुळे सहापदरी महामार्ग आणि अखंड सेवा रस्ता करण्याची गरज भासू लागल्याने सहापदरी महामार्ग आणि अखंड सेवा रस्त्याचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला. 

पुणे-सातारा महामार्गाचे काम या टप्प्यातच सुरू करून संपण्याच्या मार्गावर आहे. कागल-बेळगाव मार्गाचेही काम प्रगतिपथावर आहे; पण सातारा-कोल्हापूर महामार्गाच्या कामाचा मात्र खोळंबा झाला आहे. हे काम करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना नाहीत.

कामासाठी २५०० कोटींची निविदा काढण्यात आली; पण निविदा अजून उघडलेल्या नाहीत. जेवढी वर्दळ सातारा, पुणे या मार्गावर आहे, त्याहून अधिक वर्दळ या मार्गावर आहे. दररोज अनेक लहान-मोठे अपघात होतात. अवजड वाहने, चारचाकी, सहाचाकी, आठचाकी, बाराचाकी वाहने मार्गावरून जात असल्याने कारसह अन्य छोट्या वाहनांना अवजड वाहनधारक बाजू देत नसल्याने अनेकदा वाहनांचा वेग मंदावतो.

१३२ किलोमीटरच्या मार्गावर ३२ ब्लॅक स्पॉट आहेत. या स्पॉटवर होणाऱ्या अपघातात दरवर्षी सुमारे ६० जणांचा मृत्यू होतो, तर दोनशेहून अधिक प्रवासी जखमी होतात.
या महामार्गाला जोडून असणारे सेवा रस्तेही अखंड नाहीत. अनेक ठिकाणी सेवा मार्ग खंडित झाले आहेत.

कार्यालय अनभिज्ञच
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरात लिशा हॉटेलनजीकच्या शिवराज कॉलनीत वर्ष झाले कार्यालय थाटले आहे; पण सहापदरी महामार्गाचे काम कधी सुरू होणार, याबाबतीत हे कार्यालय अनभिज्ञच आहे. दिल्लीतून केव्हा निर्णय होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने हे कार्यालय कार्यान्वित होणार आहे.

Web Title: Kolhapur Satara Six track road work issue