नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

आमदार सतेज पाटील ः भाजपच्या केवळ घोषणाच; झेडपीवर पुन्हा कॉंग्रेसची सत्ता येईल

भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केवळ लोकांना फसवण्याचे काम केले आहे. नोटाबंदीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. गॅस सिलिंडरची दरवाढ सर्वसामान्यांच्या घरात महागाईची झळ बसण्यास कारणीभूत ठरत आहे. भाजपला मत देणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला कानाला खडा लावण्याची वेळ आली आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील मतदार कॉंग्रेसच्या हाताला बळ देतील व जिल्हा परिषदेवर पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम विश्‍वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार सतेज पाटील ः भाजपच्या केवळ घोषणाच; झेडपीवर पुन्हा कॉंग्रेसची सत्ता येईल

भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केवळ लोकांना फसवण्याचे काम केले आहे. नोटाबंदीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. गॅस सिलिंडरची दरवाढ सर्वसामान्यांच्या घरात महागाईची झळ बसण्यास कारणीभूत ठरत आहे. भाजपला मत देणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला कानाला खडा लावण्याची वेळ आली आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील मतदार कॉंग्रेसच्या हाताला बळ देतील व जिल्हा परिषदेवर पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम विश्‍वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

प्रश्‍न ः मतदारांसमोर कोणती भूमिका घेऊन जात आहात?
उत्तर ः जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्षे सत्ता असताना कॉंग्रेसने खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये निर्मल ग्राम योजनेत जिल्ह्याचा देशात दुसरा क्रमांक आला. बायोगॅस प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू केले. पंचगंगा नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे काम केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू केले. त्याचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना नक्कीच झाला. केवळ शैक्षणिक दर्जा नाही; तर शाळांना मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या. कोट्यवधी रुपयांची विकासकामे जिल्हा परिषदेने केली आहेत. रस्ते, पाणी आणि अन्य सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच शिरोदीवर आम्ही मतदारांसमोर जात आहोत.

प्रश्‍न ः विरोधकांच्या दाव्यांविषयी काय मत आहे?
उत्तर ः भाजपने देशात व राज्यात अच्छे दिनची आशा जनतेला दाखविली; मात्र अच्छे दिन या दोन वर्षांत तरी लोकांना पाहावयास मिळालेले नाहीत. केवळ राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचे उद्‌घाटन केल्याचा दिखावा केला. इंदू मिलचा विकास अजूनही ठप्प आहे. शाहू मिलचा विकास, शाहू जन्मस्थळ, खंडपीठ आणि विमानतळाचे प्रश्‍न आजही ठप्पच आहेत. जनतेला आता भाजपचा खरा चेहरा लक्षात आला असून, त्यांच्या फसव्या दाव्यांमध्ये आता मतदार अडकणार नाहीत.

प्रश्‍न ः भाजपने ताराराणीसह स्थानिक पातळीवर आघाड्या केल्याने काय फरक पडेल?
उत्तर ः भाजपकडे स्वतःचे कर्तृत्व नाही. राज्यात आणि देशातही केवळ बोलून किंवा घोषणा करून देश व राज्य चालवण्याची सवय झाली आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही हेच काम केले आहे. भाजपला स्वतःचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे पावला पावलांवर त्यांना आघाडी करावी लागत आहे. इनकमिंग करून कार्यकर्ते घ्यावे लागत आहेत. भाजपने आघाडी केलेल्या ताराराणी आघाडीतील अनेक उमेदवारांवर पूर्वी भाजपनेच आरोप केले; परंतू आता त्यांनाच रिंगणात उतरवले आहे. पालकमंत्र्यांनी ज्या केडीसीसी बॅंकेतील आर्थिक व्यवहारांबद्दल शंका व्यक्त करून प्रशासक नेमला. त्या बॅंकेतील गगनबावड्यातील पी. जी. शिंदे त्यांना कसे चालतात? ताराराणी आघाडीशी भाजपने महापालिकेमध्येही युती केली होती. या युतीला मतदारांनी नाकारले होते. त्याच पद्धतीने आताही मतदार या आघाडीला नाकारतील.

प्रश्‍न ः कॉंग्रेस एकसंध नाही, त्याचा फटका बसेल काय?
उत्तर ः कॉंग्रेस एकसंध आहे. नेत्यांमध्ये मतभेद असले तरी त्याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. मतदार कॉंग्रेसबरोबरच राहणार आहेत. कॉंग्रेसचा विस्तार सुरू आहे. शिरोळ, चंदगड, आजरा, गगनबावडा, कोल्हापूर दक्षिण या ठिकाणी कॉंग्रेसला चांगली संधी आहे. तेथील उमेदवार निश्‍चित विजयी होणार आहेत.

प्रश्‍न ः ग्रामीण भागातील जनतेला काय वाटते?
उत्तर ः नोटाबंदीचा फटका ग्रामीण जनतेला बसला. दूध उत्पादकांचे पैसे मिळाले नाहीत. आता त्यांना पैशासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेत जावे लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदी आली आहे. सात दिवसांचा आठवडा आता चार दिवसांवर आला आहे. मंदीची लाट आल्याने अनेकांचा रोजगार गेला. भाजपमुळे ग्रामीण भागात भीतीमय वातावरण आहे. कॉंग्रेसला हीच चांगली संधी मिळाली आहे.

Web Title: kolhapur: satej patil interview