राज्य कला प्रदर्शनात कोल्हापूरच भारी...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

कोल्हापूर - कलाशिक्षणातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राज्य कला प्रदर्शनात कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी यंदाही बाजी मारली. राज्याच्या कला संचालनालयातर्फे 1956 पासून या प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. यंदाचे प्रदर्शन 57 वे आहे. चार ते दहा जानेवारीदरम्यान धुळ्यातील हिरे भवन नाट्यगृह परिसरात हे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनासाठी राज्यभरातील अडीचशेहून अधिक कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्षी प्रवेशिका येतात. त्यातून पाचशेहून अधिक कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड होते. त्यात शहरातील तीन कला महाविद्यालयातील ब्याऐंशी कलाकृतींचा समावेश आहे. 

रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेचाळीस कलाकृतींची निवड झाली आहे. उपयोजित कला विभागामध्ये पहिले आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आणि दोघांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. ओंकार हांडे (उपयोजित कला, प्रथम), मनोज हवालदार (उपयोजित कला, तृतीय) यांच्यासह उपयोजित कला विभागात सौरभ जनवाडे, प्रथमेश निगवेकर यांच्या तर एटीडी विभागातून संतोष कांबळे यांच्या कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली आहेत. 

दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या तेवीस कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड झाली असून, मूलभूत अभ्यासक्रम विभागात प्रगती पाटील आणि रेखाकला व रंगकला विभागात प्राप्ती लोखंडे यांच्या कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कलामंदिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एकूण सतरा कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश असून, तानाजी कुंभारला शिल्पकला विभागात चौथे पारितोषिक मिळाले आहे. सुमित सावंत, प्रतीक सुतार आणि पवन कुंभार यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली.

Web Title: Kolhapur State Art Exhibition