कोल्हापूरचा पारा 39 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापूर - दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढतच असून, आज कोल्हापूरचा पारा 39 अंशावर गेला होता. प्रचंड उष्म्यामुळे वयोवृद्धांना प्रचंड त्रास होत असून, अनेकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. पहाटे आणि सायंकाळनंतर सुटणाऱ्या गार वाऱ्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. वळवाच्या पावसाची एकही सर बरसलेली नाही. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

उन्हामुळे दुपारी रस्त्यावरील वाहतूकही तुरळक होती. स्कार्फ, टोपीचा वापर वाढला आहे. शीतपेये विक्रीतही वाढ झाली आहे. वातानुकुलित यंत्रणेसह एअर कुलरलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांच्या खरेदीसाठी कर्ज योजनेसह अधिक मुदतीची वॉरंटीही दिली जात आहे.

रसवंती गृहांबरोबरच सोडा सेंटर्सवरही गर्दी होती. कलिंगड, काकडीला मागणी असून, रस्त्याकडेला फळाचा रस, थंडगार ताक विक्री केली जात आहे. काहींनी सामाजिक उपक्रम म्हणून पाणपोयीही सुरू केली आहे.

दुपारच्या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट जाणवतो आहे. आज सोमवार असल्याने सकाळपासूनच वीजपुरवठा बंद होता. वीज नसल्याने अंगाची लाही लाही होत होती. दुपारनंतर वीजपुरवठा सुरू झाल्याने लोकांना हायसे वाटले. वळवाची एक तरी सर येईल यासाठी सर्वच लोक प्रतीक्षा करत आहेत. महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता व्यक्त झाल्याने या उन्हाच्या तडाख्यापासून बचाव कसा करायचा, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. पशुपक्ष्यांनाही या प्रचंड उन्हाचा तडाखा बसत असून, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी केली आहे.

Web Title: kolhapur temperature 39 degree