कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

इंडिगो एअरलाईन कंपनीकडून दैनंदिन असणाऱ्या या विमानसेवेमुळे कोल्हापूरमधून आता दोन तासांत तिरुपतीला पोचता येणार आहे. यासाठी आजपासून तिकीट बुकिंगही सुरू झाले आहे. त्याचा दर २९९९ रुपये आहे.

निवेदनात म्हटले आहे, की कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच रिजनल कनेक्‍टिव्हिटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आणि उडान योजनेअंतर्गत देशातील विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू झाली आहे. विविध फेजअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. उडान फेज टू अंतर्गत एक नोव्हेंबरपासून कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगळूरसाठी विमाने उड्डाण घेत आहेत. उडान फेज-तीन अंतर्गत कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती मार्ग मंजूर आहेत. 

यामध्ये कोल्हापूर-तिरुपतीसाठी १२ मेपासून हवाई सेवा सुरू होत आहे. त्यासाठी आजपासून तिकीट बुकिंग सुरू झाले आहे.
ऑनलाईन आणि विमानतळावरील कंपनीच्या काउंटरवर तिकीट उपलब्ध झाले आहे. कोल्हापुरातून तिरुपतीसाठी सकाळी ९.४५ वाजता विमान टेकऑफ करेल. तिरुपतीहून कोल्हापूरसाठी दुपारी बाराला विमान उड्डाण करणार आहे. एटीआर असणारे हे विमान ७२ आसनी आहे. भाविकांची जुनी मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार आहे  आणि त्याचे समाधान असल्याचे श्री. महाडिक यांनी म्हटले आहे. उडानच्या फेज-टू आणि फेज-थ्रीमुळे कोल्हापूर देशाच्या हवाई नकाशावर ठळक होईल आणि त्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल. 

भाविकांची मोठी सोय - धनंजय महाडिक
कोल्हापूर-हैदराबाद विमान दुपारी २.३० मिनिटांनी टेकऑफ करणार आहे. हैदराबादहून कोल्हापूरसाठी निघणारे विमान सकाळी आठला टेकऑफ करेल. कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. दिवसात तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येता येणार आहे. लवकरच दररोजची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे, असेही महाडिक यांनी म्हटले आहे.

Web Title: Kolhapur-Tirupati Air Services from 12th May