कोल्हापुरातील हॉटेल्स संदर्भात पोलिसांचा मोठा निर्णय; पर्यटकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नवरात्रोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या लाखो पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोल्हापूर : नवरात्रोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या लाखो पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकांना उत्सवाच्या काळात आचारसंहिता जरी लागू झाली तरी रात्रीच्या अर्धातास वेळ वाढीची मुभा मिळणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यातील खाद्यपदार्थांच्या हातगड्यासह हॉटेल व्यवसाय रात्री साडेदहानंतर बंद करण्यात येत होते. आदेशाचा भंग करणाऱ्या हातगाडी व हॉटेल व्यावसायिकांवर तातडीने पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून दररोज लाखो भाविक येत असतात. पण याचदरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. उत्सव काळात ही आचारसंहिता लागली तर भाविक व पर्यटकांच्या रात्री साडेदहानंतर जेवणा-खाण्याचे हाल होतील. याचा परिणाम पर्यटन वाढीस होऊ शकतो.

'या' दिग्दर्शकाने स्वतःच्याच मुलीला केला होता लिपलॉक किस!

याबाबत नुकतेच हॉटेल व्यवसायिकांनी पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी नवरात्रोत्सवाचा विचार करून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्याला रात्रीची वेळ वाढवून मागितली होती. याचा विचार करून पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आचरसंहिता जर लागली तर त्याकाळात हॉटेल व्यवसाय रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. आचारसंहितेच्या काळात मिळालेल्या अर्धातास मुदतवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur tourism hotel will remain open till 11 pm police decision