कोल्हापुरात पर्यटनाला आला बहर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

दृष्टिक्षेपात....
*कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची कोल्हापुरात मुक्कामाला पसंती
*मुंबई-पुण्यासह दक्षिणेकडील पर्यटक
*यात्री निवास, धर्मशाळांत बुकिंग जोरात

कोल्हापूर - शालेय सुटीचा हंगाम आणि लग्नसराई सुरू आहे. काल निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापूर हाउसफुल्ल होत आहे. पुढे महिनाभर पर्यटकांची अशीच वर्दळ येथे राहणार आहे. कोकण आणि गोव्याकडे जाणारे पर्यटक कोल्हापुरात मुक्कामाला पसंती देतात, त्यामुळे येथील अर्थकारणाला गती मिळते. याची झलक शहरातील पर्यटकांची गर्दी व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे झालेल्या बुकिंगवरून दिसते.

पंधरा दिवसांपासून कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नवविवाहितांच्या वावर जत्रा कुटुंबासह विशेषतः मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात येत आहेत. सकाळी देवदर्शन, दुपारी जोतिबा, पन्हाळा पर्यटन हमखास होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोतिबा यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला आले. भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर परिसर गर्दीने फुलून जात आहे.

यंदाचा पर्यटन हंगाम तेजीत असणार असल्याची झलक महिन्याभरात येथे होत असलेल्या गर्दीवरून दिसते. यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. मुंबई-पुण्यापासून ते परप्रांतीय कौटुंबिक पर्यटकांचा समावेश आहे.

जाता-जाता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना भेट देण्याचे त्यांचे नियोजन आहे. कोल्हापूर परिसरातील ‘एमटीडीसी’ प्रमाणित रिसॉर्ट व निवास न्याहारी योजनेतील हॉटेलमध्येही बुकिंग झाले आहे. 

बहुतांश पर्यटक यात बुकिंग न करता रात्री पुण्या-मुंबईतून निघून सकाळी कोल्हापुरात येतात. दिवसभर प्रेक्षणीय स्थळे फिरतात, रात्री गोव्याकडे जातात. काही दक्षिण भारतीय विशेषतः कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. ते धर्मशाळेचे बुकिंग करतात, त्यामुळे धर्मशाळाही फुल्ल आहे.

बाहेरगावचे पर्यटक जसे कोल्हापुरात येतात, तसे कोल्हापुरातील पर्यटकही बाहेरगावी जातात. त्यामुळे एमटीडीसीकडे चौकशी करणाऱ्यांची संख्या महिन्याभरात दुप्पट झाली आहे. एमटीडीसीने ग्रुप बुकिंगवर २० टक्के सवलत, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्तींसाठी सवलत योजना सुरू केली आहे.

एमटीडीसीचे राज्यभरातील १६० निवासी सुविधांत ८० टक्के बुकिंग झाले आहे. ऐन वेळी येणाऱ्या पर्यटकांमुळेही अशी निवासस्थाने शंभर टक्के भरलेली आहेत.
- दीपक हारणे, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (पुणे)

Web Title: Kolhapur Tourism School Holiday Konkan Goa Enjoyment