पर्यटनाचा लाभ घेण्यात कोल्हापूरकर पिछाडीवर

सुधाकर काशीद
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

वाव आहे पण...
केरळ, गोवासारखी राज्ये बऱ्यापैकी पर्यटनावर अवलंबून आहेत आणि पर्यटनाचे महत्त्व ओळखून या राज्यांनी पर्यटनाला पोषक अशी धोरणे अवलंबली आहेत. कोल्हापुरात हे करणे शक्‍य आहे. कारण कोल्हापूरचे क्षेत्र तसे मर्यादित आहे, पण मर्यादित क्षेत्रात धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहसी, वन पर्यटनाला खूप वाव आहे.

कोल्हापूर - ‘पिकतंय तिथं विकत नाही... ही म्हण तंतोतंत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाट्याला आली आहे. कोल्हापूर जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे, की तेथे हिरवगार जंगल आहे, कोकणाला जाऊन भिडणारे सहा नागमोडी वळणाचे घाट आहेत. पट्टेरी वाघांपासून ते हत्तीपर्यंत वन्यप्राण्यांचा वावर आहे. अंबाबाई, नृसिंह दत्त सरस्वती, जोतिबासारखे धार्मिक अधिष्ठान आहे. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गड किल्ले आहेत. प्राचीन शिल्पकलेचे वैभव सांगणारी मंदिरे आहेत. खाद्यसंस्कृतीत वैविध्य आहे. इतके सारे वैविध्य असताना पर्यटनाच्या अंगाने त्याचा लाभ घेण्यात मात्र आपण नक्की कमी पडलो, हे स्पष्ट आहे. म्हणूनच पिकतंय तिथं विकत नाही, ही म्हण कोल्हापूर बाबतीत खरी ठरली आहे. 

वर्षभरातला नव्हे, तर काही वर्षातला पर्यटनाचा पसारा पाहिला तर तो आहे, तेवढाच मर्यादित आहे आणि तसाच कसाही, कोठेही पसरलेला आहे. त्याला एका सुत्रात बांधणे, त्याचे मार्केटिंग करणे किंवा केवळ कोल्हापूर या नावावर जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देणे लांबच, पण मार्गदर्शन करायलाही आपण मागे पडलो आहे. 

साध पंढरपूरचं उदाहरण घ्या. पंढरपुरात प्रवेश केला, की विठ्ठलाच मंदिर कोठे आहे? हे कोणालाही विचारावे लागत नाही. पंढरपुरातला प्रत्येक रस्ता आपोआप आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो, पण कोल्हापूरची स्थिती उलटी आहे. येथे परगावहून येणाऱ्या पर्यटकाला अंबाबाईचे मंदिर कोठे आहे, हे एक नव्हे दोन नव्हे, तर दहा ठिकाणी विचारावे लागते. अस विचारत विचारत मंदिराच्या आसपास आले, की पार्किंगच्या शोधात फिरावे लागते. या शोधमोहिमेत अनोळखी पर्यटकांनी वन-वेतून वाहन घातले, तर त्याला दंडाची पावती फाडावी लागते.

तेथून पुढे पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था. अंबाबाई मंदिराचे उत्पन्न कोटीत; पण मंदिराची म्हणून धर्मशाळा नाही. महालक्ष्मी भक्त मंडळाची धर्मशाळा सोडली, तर निम्मे यात्री निवास विनापरवान्याचे. त्यामुळे पर्यटकांचे हाल ठरलेले आहेत आणि हे हाल कोणाला सांगायचे झाले, तर त्यासाठी एकही अधिकृत यंत्रणा नाही, ही परिस्थिती आहे. कोल्हापूरचे वनवैभव तर राज्यात प्रसिद्ध आहे.

दाजीपूर, चंदगड, आजरा, आंबा, विशाळगड, उदगिरी परिसरात घनदाट जंगल आहे. दाजीपूरला तर गवा अभयारण्य आहे. तेथे पर्यटक जरुर येतात, पण या परिसरात दाजीपूर सोडलं तर राहायची सुरक्षित व्यवस्था नाही. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे पर्यटकाच्या सोयीसाठी आहे. या महामंडळाने कोणतीही भरीव योजना राबवलेली नाही. 
जी रेस्ट हाऊस होती, ती खासगीकरणातून चालवण्यास दिली आहेत. याउलट विशाळगड, आंबा परिसरात खासगी हॉटेलच्या इतक्‍या सुविधा आहेत, की त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. ते ‘एमटीडीसी’ ही करू शकले असते, पण तसे झालेले नाही, तरीही पर्यटक येतात. बरे वाईट अनुभवतात.

वास्तविक केरळ, गोवासारखी राज्ये बऱ्यापैकी पर्यटनावर अवलंबून आहेत आणि पर्यटनाचे महत्त्व ओळखून या राज्यांनी पर्यटनाला पोषक अशी धोरणे अवलंबली आहेत. कोल्हापुरात हे करणे शक्‍य आहे. कारण कोल्हापूरचे क्षेत्र तसे मर्यादित आहे, पण मर्यादित क्षेत्रात धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहसी, वन पर्यटनाला खूप वाव आहे. पावसाळ्यात तर निव्वळ वर्षा पर्यटन या नावाखाली पर्यटकांची गर्दी खेचता येणे शक्‍य आहे.

कारण गगनबावडा, चंदगड, आजरा, आंबा, राधानगरी परिसरातला झिम्माड पाऊस हा खूप वेगळा अनुभव आहे. 
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. फार काही करायचे राहू दे पण दाजीपूर, फोंडा, विशाळगड, आंबा, गगनबावडा, भुईबावडा, करुळ येथे जायचे कसे, राहायची सुविधा काय हे पर्यटनाच्या नकाशावर आणण्याची गरज आहे.

गडकिल्ल्यांचे महत्त्व तर त्याहून वेगळे आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना पारगड हा देखणा किल्ला कोठे आहे, हे माहीत नाही, अशी परिस्थिती आहे. पर्यटन विकासात अशा किल्ल्यांचे स्थान जगासमोर आणणे गरजेचे आहे. पन्हाळा, आंबा, विशाळगड, दाजीपूर, राधानगरी येथे पर्यटक गेला, तर त्याला राहण्या-जेवणाची खात्रीशीर सुविधा कोठे मिळेल, 
हे कळण्याची सुविधा आवश्‍यक आहे.

खिद्रापूरसारखे मंदिर शिल्प एकमेवाव्दितीय आहे, पण खिद्रापूरचे हे महत्त्व जगासमोर वारंवार आणण्याची गरज आहे. योगायोगाने अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीच्या निमित्ताने लाखो भाविक कोल्हापुरात येतात. त्यामुळे त्यांना आजूबाजूला दडलेले कोल्हापूर दाखवणे किंवा त्या पर्यटकांना तिकडे वळवणे हेच या पुढचे आव्हान असणार आहे. 

वाव आहे पण...
केरळ, गोवासारखी राज्ये बऱ्यापैकी पर्यटनावर अवलंबून आहेत आणि पर्यटनाचे महत्त्व ओळखून या राज्यांनी पर्यटनाला पोषक अशी धोरणे अवलंबली आहेत. कोल्हापुरात हे करणे शक्‍य आहे. कारण कोल्हापूरचे क्षेत्र तसे मर्यादित आहे, पण मर्यादित क्षेत्रात धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहसी, वन पर्यटनाला खूप वाव आहे.

Web Title: Kolhapur trail behind the benefits of tourism