कोल्हापूर अर्बन बॅंकेची १० लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

कोल्हापूर - बनावट कागदपत्रांआधारे कर्ज काढून बॅंकेची दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज विशाल विष्णुपंत तेजम (वय ३३, रा. कपूर वसाहत, कदमवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला. कोल्हापूर अर्बन बॅंकेचे शाखाधिकारी पद्मा राजेश बंडकर यांनी याबाबतची फिर्याद दिली. 

कोल्हापूर - बनावट कागदपत्रांआधारे कर्ज काढून बॅंकेची दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज विशाल विष्णुपंत तेजम (वय ३३, रा. कपूर वसाहत, कदमवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला. कोल्हापूर अर्बन बॅंकेचे शाखाधिकारी पद्मा राजेश बंडकर यांनी याबाबतची फिर्याद दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कपूर वसाहत येथे विशाल तेजम राहतो. मौजे कोपार्डे (ता. करवीर) येथे बांधण्यात येणाऱ्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेण्यासाठी गंगावेश येथील कोल्हापूर अर्बन बॅंकेकडे त्याने कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी त्याने दस्तऐवजांचे संचकारपत्र तारण गहाण म्हणून दिले होते. त्याआधारे त्यांना बॅंकेने फ्लॅटसाठी मार्च २०१६ मध्ये कर्ज दिले होते. त्यानंतर कर्जाचे तो हप्तेही भरत होता. तारण दिलेल्या फ्लॅटवर बॅंकेचा बोजा नोंद करून आणावा, याबाबत शाखाधिकारी पद्मा बंडकर यांनी वेळोवेळी त्याला सूचना केली होती. काही दिवसांत त्याने सात-बारा उताऱ्यावर बॅंकेचा बोजा नोंद करून ती कागदपत्रे बॅंकेकडे दिली. दरम्यान २२ एप्रिल २०१७ ला वृत्तपत्रांत तेजमने एका फायनान्स कंपनीतून कर्ज घेतले असून, ते कर्ज एनपीएमध्ये गेले आहे. ती रक्कम त्याने भरावी, अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

त्याआधारे बॅंकेने बोजा नोंद करून दिलेल्या कागदपत्राची चौकशी केली. त्यात ती कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. याबाबत तेजमला बॅंकेत बोलावून घेऊन माफीनामा लिहून घेतला. त्यानंतर कर्जाच्या रकमेपोटी त्याने बॅंकेला पाच लाख व पाच लाख १० हजार रुपये असे दोन धनादेश दिले. दोन्ही धनादेश न वटता परत आले. याबाबत आपली फसवणूक झाल्याची फिर्याद शाखाधिकारी बंडकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात काल दिली. त्यानुसार तेजमवर कलम ४०६, ४१७, ४२०, ४६३, ४६५, ४६८ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

Web Title: Kolhapur Urban Bank fraud of 10 lakhs crime