नाना कदमांचं काय झालं?

नाना कदमांचं काय झालं?

कोल्हापूर - ‘मारुती कांबळेंचं काय झालं?’ असा सिंहासन चित्रपटातील एक डायलॉग गाजत होता. एखाद्या प्रश्‍नाचा गुंता झाला तर त्यावर उत्तर मिळणे अवघड असते, तेव्हा हा डायलॉग हमखास वापरला जात होता. आता याच आशयाचा ‘नाना कदमांचं काय झालं’? असा डायलॉग कोल्हापुरातील राजकीय चर्चेत परवलीचा झाला आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या स्थानावरचे काँग्रेसचे उमेदवार नाना कदम गेल्या चार वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या आजूबाजूला होते. ते काँग्रेसपासून दूर नक्की गेले. भाजपचे भावी उमेदवार म्हणून त्यांच्या गोटात पाहिले जात होते. पण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी उमेदवार म्हणून महेश जाधव यांचे नाव जाहीर केले आणि नाना कदमांचे आता पुढे काय? या चर्चेने मूळ धरले. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत नाना कदम यांनी उमेदवारी मिळविण्यापासून आपले अस्तित्व दाखविण्यास सुरवात केली. काँग्रेसची उमेदवारी मिळाली असताना आणखी एका पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे दर्शविले होते. निवडणुकीत श्री. कदम काँग्रेसचे उमेदवार राहिले. काँग्रेसबरोबर त्यांचे व्यक्तिगत संबंध, नातेवाईक व इतर जोडण्या यातून त्यांनी ४८ हजार ७०० मते मिळवली. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण, महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी-भाजप युतीच्या माध्यमातून त्यांनी ३३ नगरसेवक निवडून आणले व आपले अस्तित्व या ना त्या कारणाने दाखवत राहिले. हे करीत असताना ते भाजपच्या जवळ जाऊन पोचले. महाडिक, सतेज पाटील वादात काँग्रेसमधून ते बाहेर फेकले गेले. पण, भाजपचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भावी उमेदवार म्हणून चर्चेच्या ओघात राहिले. नाना कदम निवडून येतील की नाही, हा फार पुढचा भाग आहे. पण, कोणाला तरी अडचणीत आणू शकतात, हे नक्की आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लागण्यापूर्वीच निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट झाले आहे.  

‘ताराराणी आघाडी’ हत्यार हाती
तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महेश जाधव यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट भावी उमेदवार म्हणून दिली आणि त्याक्षणी ‘नानांचे काय?’ या चर्चेला सुरवात झाली. अर्थात, आपली उमेदवारी डावलल्याचा अंदाज नानांना आला आहे. काँग्रेस नाही, भाजप नाही, त्यामुळे ताराराणी आघाडी हे त्यांच्या हातात हत्यार आहे. अर्थात, त्यांना अजून संधीही आहे. पण, कदमवाडी आणि कदमांचे राजकारण हे वेगळे प्रकरण आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ‘नाना कदमांचं काय झालं?’ या प्रश्‍नावर या क्षणी फिरते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com