कोल्हापूरच्या नळपाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

सिद्धेश्‍वर डुकरे
मंगळवार, 28 मार्च 2017

जलसंपदा विभागाने पाईपलाईनसाठी दिली मंजुरी
मुंबई  - कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करताना थेट पाईपलाईन टाकण्यासाठी जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना लवकरच स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे.

जलसंपदा विभागाने पाईपलाईनसाठी दिली मंजुरी
मुंबई  - कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करताना थेट पाईपलाईन टाकण्यासाठी जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना लवकरच स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे.

कोल्हापूर शहरास प्रामुख्याने पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. ही नदी प्रदूषित झाली असल्याने या शहरास काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या एका कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर शहर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे.

यासाठी 2013 मध्ये 425 कोटींची योजना आर्थिक मदतीसह मंजूर केली आहे. यामध्ये काळम्मावाडी धरण जलाशयाच्या उजव्या बाजूने 1800 मि.मी. व्यासाची व 23.97 कि. मी. लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून, त्याद्वारे कोल्हापूर शहरास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेस पाटबंधारे खात्याच्या जागेमध्ये हेडवर्क्‍स बांधणे आणि कालव्याच्या सेवा पथाच्या बाजूने जमिनी खालून पाईप टाकण्यासाठी जमिनीची आवश्‍यकता होती. यानुसार जलसंपदा विभागाने नाममात्र म्हणजे एक रुपया वार्षिक भाडे घेऊन त्यास परवानगी दिली आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेचा सुमारे 20 कोटी रुपये इतका निधी वाचला आहे.

जलसंपदा विभागाने खास बाब म्हणून ही मंजुरी दिली आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर यांनी जलसंपदा राज्यमंत्री यांच्याबरोबर जून 2016 मध्ये एका बैठकीचे आयोजन करून त्यात निर्णय घेतला. यानुसार जलसंपदा विभागाच्या ताब्यातील कालव्याच्या कडेची जागा थेट पाईपलाईनसाठी नाममात्र भाडे आकारून देण्यात यावी. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करावा, असा निर्णय झाला. यामुळे कोल्हापूरला शुद्ध पाणी मिळण्याच्या योजनेला वेग येणार आहे.

कोल्हापूर शहराचा कित्येक वर्षांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊन नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल. त्यासाठी जलसंपदा विभागाने खास बाब म्हणून मंजुरी दिली आहे.
- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री

Web Title: kolhapur water supply scheme permission