सुटल्याऽऽऽ गाड्या...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

उद्या मुख्य यात्रा : सौंदत्ती यात्रेसाठी भाविक डोंगराकडे

कोल्हापूर: कुणी आजीला-आईला, तर कुणी काका-अण्णांना गाडीपर्यंत सोडायला आलेले...जाता जाता कपाळाला भंडारा लावून घेत "डोंगराला निघालाय, हे माझे पाच रुपये घ्या, माझ्या नावाने कापूर जाळा', अशी होत असलेली विनंती आणि एकूणच "उदे उदे बोला-डोंगराला चला' असे उत्साहाने भारलेले वातावरण आज सकाळी संपूर्ण शहराने अनुभवले.

दरम्यान, काल (शुक्रवारी) अठरा बसेस आणि आज शंभरहून अधिक वाहनांचा ताफा डोंगराकडे रवाना झाला. दोन दिवसांत शहरातील अडीचशेहून अधिक एसटी बसेससह चारचाकी गाड्या डोंगराकडे रवाना होणार असून सुमारे अडीच लाख कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. 12) यात्रेचा मुख्य सोहळा सजणार आहे.

शहरातील प्रमुख पेठा आणि उपनगरांत काल रात्रीपासूनच लगबग सुरू झाली. आजची पहाटही त्याच लगबगीने उजाडली. पाच-सहा वाजताच एसटी महामंडळाच्या बसेस, खासगी प्रवासी गाड्या गल्ली-गल्लीत येताच पुन्हा धांदल सुरू उडाली. पताका, झिरमुळ्या आणि थर्माकॉलच्या विविध अक्षरांनी गाड्या सजविण्यात आल्या. आपापल्या गटातील सर्व भाविकांना एकत्रित आणून गाड्या सोडण्याचे नियोजन सुरू झाले. गाड्यांवर लावलेल्या ध्वनिक्षेपकावरील "शिवशंभूची तू सखया आदिशक्ती महामाया', "सुती-चौंडकं वाजे मंजूळ' अशा गीतांनी सारा माहोल भारलेला होता. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाड्या डोंगराकडे रवाना झाल्या. सकाळी अकरापर्यंत यल्लमाचा ओढा, तसेच लक्ष्मी टेकडी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला.

चालकांचा सन्मान
सकाळी एसटी बसेस गल्लीत आल्यानंतर परिसरातील ज्येष्ठांच्या हस्ते त्यांची विधिवत पूजा झाली. बसेसच्या चालकांना कोल्हापुरी फेटा बांधून सन्मान करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला सौंदत्तीवर यात्रा भरते. या यात्रेची "कोल्हापूरची डोंगराची यात्रा' अशीच ओळख आहे.

Web Title: kolhapur yatra