कोल्हापूरच्या युवा शास्त्रज्ञांची चांद्रभरारी...!

डावीकडून अनुक्रमे सौमिल वैद्य, ऐश्‍वर्या मुंगळे, अनिकेत कामत.
डावीकडून अनुक्रमे सौमिल वैद्य, ऐश्‍वर्या मुंगळे, अनिकेत कामत.

कोल्हापूर - एक्‍स प्राइड फाउंडेशन व "गुगल'च्या वतीने 2007 मध्ये झालेल्या "गुगल लुनार एक्‍स प्राइझ' स्पर्धेत बंगळूरच्या राहुल नारायण व त्यांच्या युवा शास्त्रज्ञांच्या "टीम इंडस'ने यश मिळवले. "टीम इंडस'ने त्यांच्या चांद्रयानाबरोबर पाठवता येईल, अशा उपकरण निर्मितीसाठी घेतलेल्या "लॅब-टू-मून' या स्पर्धेतून आता येथील अनिकेत कामत, ऐश्‍वर्या मुंगळे आणि मुंबईच्या सौमिल वैद्य यांच्या "इलेक्‍ट्रोस्टॅटिक ऍक्‍टिव्ह रेडियशन शिल्ड' या उपकरणाची निवड झाली आहे. स्पर्धेत जगभरातील युवा संशोधकांच्या तीन हजारांवर उपकरणांचा सहभाग होता.

दरम्यान, अनिकेतसह तिघांच्या या "टीम इअर्स'ला पुढचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आता आर्थिक पाठबळाची गरज असून, समाजातील विविध घटकांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन आज ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी कुतूहल फाउंडेशनचे सचिन जिल्हेदार, आनंद आगळगावकर आदी उपस्थित होते.

"गुगल लुनार एक्‍स प्राइझ' स्पर्धेत जगभरातील पंचवीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला. चंद्रावर रोव्हर (चांद्रबग्गी) नेऊन ती चंद्रावर यशस्वीरीत्या पाचशे मीटर चालवणे आणि त्यावरील कॅमेऱ्याच्या माध्यमातून उच्चप्रतिचे फोटो काढून ते पृथ्वीवर मिळवणे, हे आव्हान जी कोणती संस्था यशस्वीरीत्या पेलेल, तिला "गुगल'कडून दोन कोटी अमेरिकन डॉलरचे (अंदाजे 134 कोटी रुपये) बक्षीस आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार म्हणून भारतातील "टीम इंडस', इस्राईलमधील "स्पेस आय एल', जपानमधील "हकुतो' आणि अमेरिकेची "मून एक्‍स्प्रेस' तसेच इतर देशांची मिळून "सिनर्जी मून' या पाच संस्था मानल्या जातात. बंगळूरच्या राहुल नारायण या युवा अभियंत्याच्या संकल्पनेतून "टीम इंडस'ची निर्मिती झाली. "टीम इंडस'च्या युवा शास्त्रज्ञांनी "गुगल'चे हे आव्हान स्वीकारले आणि या संस्थेने आपण बनवलेल्या चांद्रयानामध्ये थोडी जागा राखून ठेवली. जगभरातील तरुण शास्त्रज्ञांनी केलेले काम व संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश. या राखीव जागेवर काही उपकरणे ठेवून ती चंद्रावर पाठवता यावीत, म्हणून जगभरातील पंचवीस वर्षांखालील युवा शास्त्रज्ञांसाठी "टीम इंडस'ने "लॅब 2 मून' ही स्पर्धा घेतली. त्यात "टीम इअर्स'ची निवड झाली आहे.

काय आहे हे उपकरण आणि ईएआरएस?
इअर्स (ईएआरएस) म्हणजेच "इलेक्‍ट्रोस्टॅटिक ऍक्‍टिव्ह रेडिएशन शिल्ड' या प्रयोगाचा हेतू पृथ्वीबाहेरील घातक वैश्‍विक किरणांपासून (रेडिएशन) संरक्षण मिळवता येईल का, यावर अभ्यास करणे हा आहे. जेव्हा एखादा अंतराळवीर पृथ्वीबाहेर जातो, तेव्हा तेथे असलेल्या घातक व अतिउच्च तीव्रतेच्या वैश्‍विक किरणांमुळे त्याला गंभीर इजा होण्याची शक्‍यता असते. इअर्स प्रयोगामध्ये एक स्थितीकविद्युत क्षेत्र निर्माण करणारा छोटा वेन डी ग्राफ जनरेटर बसवण्यात आला आहे. हा जनरेटर स्थितीकविद्युत क्षेत्र निर्माण करेल व त्याच्या क्षेत्रात येणाऱ्या वैश्‍विक किरणांची दिशा बदलेल व त्यामुळे ती जागा वैश्‍विक किरणांपासून संरक्षित होईल. या प्रयोगाची कल्पना आताचे एलसीडी व एलईडी टीव्ही येण्यापूर्वीचे जे पारंपरिक टीव्ही होते, त्याच्या कार्यपद्धतीतून सुचली, असे अनिकेत, ऐश्‍वर्या आणि सौमिल सांगतात.

अशी आहे टीम...
अनिकेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. ऐश्‍वर्या भौतिकशास्त्रात पदवी घेऊन सध्या गोव्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे आणि कोल्हापूरच्याच केआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन सध्या शासकीय सेवेत असणारा सौमिल सध्या संशोधनाचे काम करतो. तिघेही केआयटी कॉलेजमधील गगनवेधी ग्रुपचे सक्रिय सदस्य आहेत. जुलैमध्ये "फेसबुक'वर त्यांना या स्पर्धेची माहिती मिळाली आणि ही टीम कामाला लागली. दरम्यान, कोल्हापुरातील नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशाने सुरू झालेल्या कुतूहल फाउंडेशनचा अनिकेत संस्थापक सदस्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com