देशभक्तीने गाठली आगळी-वेगळी उंची!

देशभक्तीने गाठली आगळी-वेगळी उंची!

कोल्हापूर - लेह-लडाखचा दुर्गम परिसर. त्यातून १७ हजार ६८८ फुटांच्या उंचीवरून जाणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोटारसायकलचा खडतर मार्ग. त्या मार्गावरून मोटारसायकलने गेलेले तीस युवक. त्या मार्गावर तिरंगा फडकवून त्यांनी ‘भारत माता की जय...’चा केलेला जल्लोष. अशी देशभक्तीची आगळी-वेगळी उंची गाठत कोल्हापुरातल्या या युवकांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यांचा हा जयघोष जगातल्या या दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवरील दऱ्याखोऱ्यांत दुमदुमत राहिला. कोल्हापूर हायकर्सने या मोहिमेच्या संयोजनाचा मोठा वाटा उचलला. 

या सर्व जणांनी मनाली येथून बुलेट मोटारसायकलवरून मोहिमेला सुरुवात केली. काल ते चांगलाग पास या १७६८८ फूट उंचीवरील खिंडीत पोहोचले. हा मार्ग जगातला सर्वात उंचीवरचा दोन नंबरचा मोटारसायकल मार्ग म्हणून ओळखला जातो. काल स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ते मार्गक्रमण करत या मार्गावर पोहोचले.

युवती आणि ज्येष्ठांचा सहभाग
नेहा पाठक, अपूर्वा खोपकर, कृतिका शेटे या तीन युवतींनीही या मोहिमेत सहभाग घेतला, तर सतीश अजमेरा यांचे वय ६५. त्यांनी मोटारसायकलवरून ही मोहीम पार केली.

एवढ्या उंचीवर आणि तेही स्वातंत्र्य दिनादिवशी, त्यामुळे त्यांनी या क्षणाचे औचित्य साधत त्यांच्याजवळचा एक ध्वज तेथेच फडकवला, राष्ट्रगीत म्हटले व त्यानंतर ‘भारत माता की जय...’, ‘वंदे मातरम...’,  ‘जय भवानी, जय शिवाजी..’ असा जयघोष करत सारा परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर काही वेळ या परिसरात थांबून त्यांनी आपला प्रवास पुढे सुरू ठेवला. 

या मार्गावरून प्रवास म्हणजे सुरुवातीला इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला करावी लागणारी कसरत. येथे सहज श्‍वासच घेता येत नाही, श्‍वास घेतानाही दम लागतो. या वातावरणात मोटारसायकल प्रवास हे आव्हान असते; पण कोल्हापूरच्या युवकांनी हे आव्हान पेलले, आणि तेथे तिरंगा फडकावून या आव्हानाचे सार्थकही केले. 

मोहिमेत कोल्हापुरातले सागर पाटील, आशीष काळे, अभिजित जाधव, अमोल पाटील, संतोष हरिश्‍चंद्रे, संदीप माने, अनिल बोपटे, वैभव दरेकर, अमोल शिंदे, सुरेश चौगुले, सुरेश भुगे, बाळासो चौगुले, शिवाजी यादव, सुनील गवळी, श्रीहरी भुमरे, नितीन शेटे, नेहा पाठक, अपूर्वा खोपकर, कृतिका शेटे, मधुकर शिंदे, योगेश सांदान, पद्मराज रांगोळे, अजित धांडोके, गणेश पाटील, वरद आपटे, धवल आपटे व सतीश अजमेरा हे सहभागी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com