कोल्हापूर जिल्हा परिषद भरणार ७०० पदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर नोकर भरतीला वेग आला आहे. जिल्हा परिषदेकडील २३ प्रकारची साधारण ७०० पदे रिक्‍त आहेत. या रिक्‍त पदांची माहिती बुधवारपर्यंत (ता.५) देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत; मात्र ही माहिती सादर करण्यासाठी, बिंदू नामावली ठरवण्यासाठी किमान दोन दिवस लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. रिक्‍त पदांच्या माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत दिवसभर गडबड सुरू होती.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही नोकर भरती करण्यात येईल, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.
मराठा आरक्षण प्रश्‍नामुळे राज्यात नोकर भरतीला ब्रेक देण्यात आला होता, मात्र आता शासनाने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
शासनाने विविध विभागांप्रमाणेच जिल्हा परिषदांकडे रिक्‍त पदांची माहिती मागवली आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवर २३ प्रकारची पदे आहेत. या पदांमधील रिक्‍त पदे, त्याची बिंदुनामावली, मराठा समाजाचा कोटा आदीबाबतची माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेकडून औषधनिर्माता, वरिष्ठ सहायक (लेखा), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कनिष्ठ आरेखक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (कृषी), वरिष्ठ सहायक (लिपिक),पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत, लघुलेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरेखक, स्थापत्य अभिंयात्रिकी सहायक, कनिष्ठ यांत्रिकी या २३ प्रकारच्या पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन देणार शैक्षणिक अर्हतेची माहिती
जिल्हा परिषदेकडील पदांच्या अनुषंगाने शैक्षणिक अर्हता व शैक्षणिक अभ्यासक्रम याची माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी रविकांत आडसूळ यांना विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि विस्तार अधिकारी (पंचायत) या पदांची शैक्षणिक अर्हता व अभ्यासक्रम सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Kolhapur Zilla Parishad fills 700 posts